उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे बांबू घरावर पडून काही घराचे नुकसान
By सदानंद नाईक | Published: September 29, 2023 07:11 PM2023-09-29T19:11:47+5:302023-09-29T19:12:57+5:30
घरात कोणी नसल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगर परिसरात एका धोकादायक इमारतीला बांधलेले बांबू जोरदार वारा व पावसाने खालील घराच्या छतावर पडून ३ घरांचे नुकसान झाले. घरात कोणी नसल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील गावडे शाळा परिसरात सिमरन नावाची ५ मजली इमारत आहे. महापालिकेने २ वर्षांपूर्वी इमारत धोकादायक घोषित करून खाली केली. गुरवारी जोरदार हवा व पावसाने इमारतीला बांधून ठेवण्यात आलेल्या बांबू पैकी काही बांबू इमारतीला खालील काही घरावर पडल्याने, घरावरील सीमेंटची पत्रे फुटून बांबू आरपार घरात गेले. एका घरातील कुटुंब गावी गेले होते. तर दुसऱ्या घराचे कुटुंब बाप्पांची विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी बाहेर गेल्याने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बांबू आरपार पत्रे तोडून घरात गेल्याने, पावसाचे पाणी घरात पडून नुकसान झाले. महापालिकेने अश्या इमारतीवर पाडकाम कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. तर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी।महापालिकेच्या वतीने खबरदारीचे त्वरित निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिली.