उल्हासनगरात शिवसेना शाखेवरून ठाकरे व शिंदे गट आमने-सामने
By सदानंद नाईक | Published: April 19, 2023 04:11 PM2023-04-19T16:11:15+5:302023-04-19T16:11:25+5:30
शिवसेना शाखेच्या दोन्ही गटाकडे राहणार चाव्या, पोलिसांनी काढला समझोता.
सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाचे नेते व शिवसैनिक मंगळवारी आमनेसामने आल्याने, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा ठाकला होता. अखेर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी मध्यस्थाची भूमिका वठवून त्यांच्या समझोता घडवून आणला. शाखेच्या कुलपच्या चाब्या दोन्ही गटाकडे ठेवण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ विभागातील कैलास कॉलनीसह इतर शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी दुपारी शाखेचे कुलुप तोडून शाखा ताब्यात घेतल्या. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहर पूर्वेचे शहरप्रमुख रमेश चव्हाण यांच्यासह स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना शाखाचे कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतल्याची माहिती ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी, महिला संघटक जया तेजी यांच्यासह शिवसैनिकाला मिळाल्यावर, त्यांनी शाखेत धाव घेऊन शाखेला लावलेले कुलूप तोडून शाखा ताब्यात घेतल्या. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट आमनेसामने आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचें वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे व पोलीस निरीक्षक पी डी करडकर यांना मिळाल्यावर, त्यांनी दोन्ही गटाच्या नेत्या सोबत चर्चा केली.
शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी दोन्ही गटाच्या पदाधिकाऱयांची बुधवारी सकाळी बैठक बोलाविली होती. बैठकीत दोन्ही गटाच्या नेत्यांची व शिवसैनिकांची समजूत काढून जोपर्यंत पक्षाबाबत न्यायालयाचा निकाल येत नाही, तोपर्यंत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी शाखेचा वापर करून शाखेच्या कुलपाची चाबी दोन्ही गटाकडे ठेवण्यास समझोता झाला. या समझोतानुसार दोन्ही गटातील वाद टळला असून दोन्ही गटाचे नेते बसणार आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांनी काढलेला समझोता मान्य असल्याचे सांगितले.
पोलिसांची जबाबदारी वाढली....बोडारे
शिवसेना शाखेवरून ठाकरे व शिंदे गटातील वाद पोलिसांच्या मध्यस्थीमुळे काही काळा पुरता थांवला आहे. मात्र यातून तोडगा काढावा लागणार असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी व्यक्त केले. कॅम्प नं-५ मधील शिवसेना शाखा ठाकरे गटाच्या ताब्यात असून शिंदे गटाने घुसखोरी केल्याचा आरोप बोडारे यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"