उल्हासनगरात सहायक पोलीस आयुक्तांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमातच भाजपकडून पक्ष प्रवेशाची ऑफर
By सदानंद नाईक | Published: June 3, 2023 04:32 PM2023-06-03T16:32:38+5:302023-06-03T16:32:45+5:30
शहरातील व्यापारी संघटना व भाजपकडून सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या सेवानिवृत्त निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
उल्हासनगर : शहरातील व्यापारी संघटना व भाजपकडून सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या सेवानिवृत्त निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी राठोड यांना थेट भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याने, उपस्थितांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळ मधील सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड हे ३१ मे रोजी तब्बल ३५ वर्षाच्या पोलीस सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कालावधीत त्यांनी सर्वच समाज, व्यापारी मंडळ, राजकीय नेते, नागरिक आदी सोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. पोलिस विभागाकडून त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रम रिजेन्सी येथें साजरा करण्यात आला. त्यापाठोपाठ शहर व्यापारी संघटना व भाजपने राठोड यांच्या सेवानिवृत्त निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला विविध व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, आमदार कुमार आयलानी, पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे, भाजपा शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीस उपायुक्त पाठारे, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी उल्हासनगर बाबत गौरवउद्गार काढले. येथे येण्यापूर्वी आम्हाला जे सांगण्यात आले, त्यापेक्षा उल्हासनगर चांगले असून शहराचा गुण घेण्यासारखा असल्याचे म्हणाले.
आमदार कुमार आयलानी यांनी सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्या कामाचा गौरव करून असेच अधिकारी शहराला यापुढे मिळो, अशी भावना व्यक्त केली. तर भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी सेवानिवृत्त झालेले राठोड यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक करून असे अधिकारी देशाला हवे आहेत, असे म्हणाले. तसेच सेवानिवृत्त नंतरचे आयुष्य चांगले जावो, त्यासाठी त्यांनी राठोड यांना सेवानिवृत्त कार्यक्रमात शुभेच्छा देऊन भाजप प्रवेशाचे खुले आमंत्रण दिले. पुरस्वानी यांच्या थेट प्रवेशाच्या ऑफरची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. मात्र राठोड यांनी राजकीय पक्ष प्रवेशाबाबत बोलणे आतातरी टाळले आहे.