उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी
By सदानंद नाईक | Published: July 20, 2022 06:34 PM2022-07-20T18:34:55+5:302022-07-20T18:35:24+5:30
गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून सन २०११ च्या जनगणेनेच्या तुलनेत तब्बल सव्वा लाख मतदार संख्या कमी झाल्याचे उघड झाले. तर गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली.
शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने, मतदार स्थलांतरित झाल्याचे बोलले जाते. उल्हासनगर महापालिकेने सन २०११ च्या जनगणनानुसार उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या यादीनुसार शहरातील मतदारांची संख्या ५ लाख ६ हजार होती. मात्र, दरम्यान वालधुनी नदीच्या प्रदूषणाला जीन्स कारखान्याना जबाबदार धरून जीन्स उद्योगावर कारवाई केल्यावर, जीन्स उद्योगासह त्या संबंधीत कारखाने व त्यामध्ये कामगार तसेच सिंधी समाज मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले. त्याचा परिणाम मतदार यादीवर झाला आहे. त्यामुळे पाच लाखांवरून मतदारांची संख्या तीन लाख ७३ हजार ७०२ वर आली आहे. त्यात दोन लाख दोन हजार ५४७ पुरुष, एक लाख ७१ हजार ८० महिला आणि ७५ तृतीयपंथी यांचा समावेश आहे.
गेल्यावेळी महापालिकेत एकून २० प्रभाग होते. त्या मधून ७८ नगरसेवक निवडून आले. यावेळी तीन सदस्यीय २९ तर दोन सदस्यीय १ असे एकून ३० प्रभागातून ८९ नगरसेवक निवडून येणार आहे. गेल्या वेळी पेक्षा ११ नगरसेवकाच्या संख्येत वाढ होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, निवडणूक विभागप्रमुख मनिष हिवरे यांनी दिली आहे.
शहर सिंधी समाज बहुल असल्याचे बोलले जाते. मात्र सिंधी समाजाची मतदार संख्या झपाट्याने कमी होत असल्याने, मराठी व उत्तर भारतीय नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सिंधी समाजाने व्यक्त केली चिंता
उल्हासनगर म्हणजे सिंधी समाज बहुल संख्या असलेले शहर अशी ओळख आहे. मात्र ही ओळख इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली. सिंधी समाज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर व ठाणे आदी ठिकाणी मोठया प्रमाणात स्थलांतरित होत आहे. त्यामुळे मतदार यादीवरून नजर फिरविल्यास सिंधी समाजाचे मतदार कमी झाल्याचे उघड झाले.