उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई

By सदानंद नाईक | Published: October 29, 2022 01:37 PM2022-10-29T13:37:30+5:302022-10-29T13:38:12+5:30

शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत.

In Ulhasnagar there will be action against taps illegal taps municipal comissioner | उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई

उल्हासनगरात घर तेथे नळ, अवैध नळजोडणी होणार कारवाई

Next

उल्हासनगर : शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. तसेच एक पेक्षा जास्त नळ जोडण्या असणाऱ्यावर कारवाई केली जाण्याचे संकेत आयुक्तांनी दिले असून नळ जोडण्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

उल्हासनगर महापालिकेला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होऊनही शहराच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गेल्या महिन्यात शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढून पाणी टंचाईची समस्या दूर करण्याची मागणी केली. सुभाष टेकडी भागातील ३० हजार पेक्षा जास्त लोकसंख्याला पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. दररोज महापालिका पाणी पुरवठा विभागावर लहान-मोठे मोर्चे येत असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश वानखडे यांनी दिली. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५ लाख असून नियमानुसार प्रत्येकी १३५ लिटर पाणी लागते. लोकसंख्येनुसार ८० एमएलडी पाणी पुरवठा शहराला पुरेसा आहे. यामध्ये २० एमएलडी पाणी गळतीचा समावेश केल्यास एकूण १०० एमएलडी पाणी पुरवठा शहराला लागतो. मात्र शहराला दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा एमआयडीसीकडून होऊनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. 

शहरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी घर तेथे नळ योजना राबविणार आहेत. मात्र एका पेक्षा जास्त नळजोडण्या असणाऱ्या इमारती व घरावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. आयुक्तांच्या या निर्णयाने खळबळ उडाली असून घर तेथे नळ योजना राबविण्यापूर्वी घरघर व इमारती मध्ये जाऊन महापालिका कर्मचारी नळजोडणीचे सर्वेक्षण करणार आहेत. नळ जोडणी सर्वेक्षणापूर्वी नागरिकांनी व इमारातधारकांनी नियमानुसार जास्त नळजोडण्या घेतल्या असल्यास खंडित करण्याचे आवाहन आयुक्त शेख यांनी केले. शहरात अवैध नळ जोडणीमुळेच शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जाते. निळ्या व जुन्या जलवाहिणीतून बहुतेक नागरिकांनी एक पेक्षा जास्त नळजोडण्या घेतल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच पाणी टंचाई निर्माण झाली.

पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्के 
शहरात ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्के असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देत आहेत. ज्या भागात जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या बदलणे आवश्यक असून त्याशिवाय पाणी टंचाई समस्या निकाली लागणार नसल्याचे बोलले जात आहे.

Web Title: In Ulhasnagar there will be action against taps illegal taps municipal comissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.