दिवाळी तोंडावर असतांना अवघ्या ५८ स्टॉल धारकांनाच परवानगी, ७४७ अर्ज प्राप्त
By अजित मांडके | Published: October 18, 2022 05:40 PM2022-10-18T17:40:35+5:302022-10-18T17:40:56+5:30
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने 747 पैकी केवळ 58 स्टॉल धारकांना परवानगी दिली आहे.
ठाणे : यंदा कोरोनोचे र्निबध शिथील झाल्याने, सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. अशातच आता दिवाळी सणही मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार असून फटाक्यांची आतषबाजीही यंदा होणार आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या माध्यमातून फटाक्यांचे स्टॉल लावण्यासाठी प्रभाग समितीनिहाय परवाने देण्यास सुरवात केली आहे. परंतु आतापर्यंत आलेल्या ७४७ अर्जापैकी केवळ ५८ जणांनाच परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसांवर दिवाळी आली असतांना महापालिकेच्या कारभारावर प्रश्न विचारले जात आहेत.
यंदा दिवाळी सण देखील मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. परंतु ठाणे महापालिकेकडून फटाके विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांना अद्यापही परवाने देण्यासाठी उशीर होत असल्याचेच दिसून आले आहे. फटाके स्टॉलला परवाना देण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन पध्दतीने केली जात आहे. यात अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला देखील घ्यावा लागत आहे. परंतु त्यासाठी देखील स्टॉल धारकांना कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. हे परवाने मिळविण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात आहे.
त्यानंतर पुन्हा हे पुरावे आणल्यानंतर प्रभाग समितीच्या माध्यमातून परवाने दिले जात आहेत. त्यातही प्रभाग समितीत उपलब्ध असलेल्या मैदानांच्या ठिकाणीच हे परवाने दिले जात आहेत. तसेच त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा देखील सज्ज ठेवली जाणार आहे. मागील वर्षी देखील दिवाळी दोन दिवसांवर आली असतांना पालिकेकडून स्टॉल धारकांना परवानगी दिली जात असल्याचे दिसून आले होते. यंदा देखील आता दिवाळी पाच दिवसांवर आली असतांनाही पालिकेच्या वागळे प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समितीमधून परवाने देण्याची प्रक्रिया धिम्या गतीने सुरु असल्याचेच दिसून आले आहे.
दरम्यान आतार्पयत पालिकेच्या ९ प्रभाग समिती अंतर्गत ७४७ स्टॉल धारकांनी अर्ज केले असून त्यातील केवळ ५८ स्टॉल धारकांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरीत कार्यवाही प्रस्तावित असल्याचे पालिकेने सांगितले आहे. त्यामुळे दिवाळीसाठी किमान एक आठवडा तरी आधी परवानगी देणे गरजेचे असल्याचे मत स्टॉल धारकांनी व्यक्त केले आहे. आम्ही नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करीत असतो. मात्र पालिकेकडून दरवर्षी परवाने देण्यास विलंब केला जात आहे.
प्रभाग समितीनिहाय स्टॉल धारकांना परवानगी देण्याचे काम सुरु आहे. आलेल्या अर्जावर तात्काळ निर्णय घेऊन परवानगी देण्याच्या सुचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार एक दोन दिवसात सर्व स्टॉल धारकांना परवानगी दिली जाईल. अशी माहिती उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.