वॉशिंग्टनमध्ये डॉ. बेडेकरांनी पूर्ण केली १३ वी फुल्ल मॅरेथॉन, एकमेव भारतीय स्पर्धेत सहभागी
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 19, 2022 05:50 PM2022-09-19T17:50:45+5:302022-09-19T17:51:16+5:30
ठाणे : वॉशिंग्टन येथील नॉर्थ बँड या शहरात घेण्यात येणाऱ्या लाईट ऑफ द टनल मॅरेथॉन या स्पर्धेत भारतातून डॉ. ...
ठाणे : वॉशिंग्टन येथील नॉर्थ बँड या शहरात घेण्यात येणाऱ्या लाईट ऑफ द टनल मॅरेथॉन या स्पर्धेत भारतातून डॉ. महेश बेडेकर हे एकमेव स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत डॉ. बेडेकर यांनी ३ तास १६ मिनिटांत ४२.२ किमीची फुल्ल मॅरेथॉन पूर्ण केली. जगातील सहा मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर निसर्गात धावण्याचा एक वेगळा अनुभव घेता आला असे डॉ. बेडेकर यांनी सांगितले.
नॉर्थ बँड या परिसरात राहणाऱ्या एका अमेरिकन महिलेने ही स्पर्धा वैयक्तीक स्तरावर आयोजित केली होती. २०१४ पासून ते अशा मॅरेथॉनचे आयोजन करीत आहेत. या स्पर्धेत ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात डॉ. बेडेकर हे एकमेव भारतीय स्पर्धक होते. बर्लिन, न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, शिकागो आणि शेवटची बोस्टन या मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर ते न्यू बँड येथील स्पर्धेत सहभागी झाले. यावेळेस पण अचूक वेळ जुळून आल्याचे डॉ. बेडेकर म्हणाले. लाईट ऑफ द टनल मॅरेथॉनमध्ये बोगद्यातून धावण्याचा अनुभव आला. आधीच्या स्पर्धांमध्ये ३० ते ४० हजार स्पर्धक धावत होते. इथे ५०० स्पर्धक असल्याने कित्येक किलोमीटर मी एकटाच होतो. परंतु स्पर्धक नसले तरी निसर्ग मात्र सोबत होता अशा भावना डॉ. बेडेकर यांनी व्यक्त केल्या.
या स्पर्धेसाठी त्यांनी २०१९ मध्येच नेंदणी केली होती. परंतु त्यानंतर आलेला कोरोनाचा काळ यामुळे या स्पर्धेत भाग घेता आले नाही. परंतू यंदा त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन १३ वी फुल्ल मॅरेथॉन डॉ. बेडेकर यांनी पूर्ण केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांसाठी त्या अमेरिकन ज्येष्ठ महिला नागरिकाने घरातून सूप बनवून आणले होते. त्यामुळे एक भावनिक नाते निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.