बँक खात्यात चुकून जमा पैशांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 04:07 AM2018-07-10T04:07:35+5:302018-07-10T04:07:42+5:30
बँक खात्यात चुकून जमा झालेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या गणेश बयनेत (२५, रा. साठेनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.
ठाणे : बँक खात्यात चुकून जमा झालेल्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या गणेश बयनेत (२५, रा. साठेनगर, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. त्याला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्याच्या चंदनवाडीमध्ये राहणारे मयूरेश शेळके (२५) यांचे भाऊ विनायक शेळके हे लष्करी अधिकारी आहेत. त्यांनीच मयूरेश यांना पैसे देण्यासाठी निलेश दातखिळे या अन्य एका नातेवाइकाच्या बँक खात्यावर आॅनलाइन बँकिंगद्वारे ३० एप्रिल २०१८ रोजी आयसीआयसीआय बँकेतून एक लाख रुपये पाठवले होते. ते पाठवताना विनायक यांच्याकडून चुकून खात्याचा एक क्रमांक चुकीचा भरला गेला. त्यामुळे हे पैसे साठेनगरामध्ये राहणारे गणेश बयनेत याच्या आयसीआयसीआय बँकेच्या मुंबई सेंट्रल येथील शाखेतील खात्यावर जमा झाले. आपल्या खात्यात अनवधनाने जमा झालेल्या पैशांची कोणतीही खात्री न करता गणेशने २ मे रोजी लगेच एक लाखांपैकी ९१ हजार रुपये खात्यातून काढून घेतले. इकडे पैसे न मिळाल्यामुळे दातखिळे यांनी बँकेत चौकशी केली. तेव्हा त्यांना गणेशच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे समजले. वारंवार विनंती करुनही पैसे न मिळाल्याने मयूरेश यांनी याप्रकरणी अखेर नौपाडा पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने त्याला ठाण्यातून अटक केली.