अपुर्या ऑक्सिजनमुळे बदलापुरात रुग्णांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:39 AM2021-04-15T04:39:02+5:302021-04-15T04:39:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने गौरी हॉल येथे उभारलेल्या २०० बेडच्या रुग्णालयात नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने गौरी हॉल येथे उभारलेल्या २०० बेडच्या रुग्णालयात नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. अनियमित ऑक्सिजन पुरवठ्यामुळे प्रशासनदेखील त्रस्त आहे. रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपणार असल्याने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवरदेखील सोशल मीडियावर ऑक्सिजन मिळविण्यासाठी आवाहन करण्याची वेळ आली होती.
या रुग्णालयातील २०० पैकी ३० बेड हे आयसीयूचे आहेत. बदलापूर शहरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने तेवढ्याच प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरात वाढल्याने बदलापूरचे जान्हवी हॉल आणि गौरी हॉल येथील सर्व बेड भरले आहेत. गौरी हॉल येथील २०० बेड पूर्णपणे भरले असून, त्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात लागत आहे. रुग्णांची वाढलेली संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने बदलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कोविड रुग्णालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्थेला मोठी कसरत करावी लागत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने कोणत्या क्षणाला तो संपेल, याची शाश्वतीदेखील राहिलेली नाही. येणाऱ्या ऑक्सिजनवरच रुग्णांचा जीव अवलंबून असल्याने अधिकारीदेखील आता हतबल झालेले दिसत आहेत.
मंगळवारी रात्री गौरी हॉल येथील ऑक्सिजन मध्यरात्री तीन वाजेपर्यंतच चालणार असल्याने आणि पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था न झाल्याने मुख्याधिकार्यांवर तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध करून घेण्यासाठी समाज माध्यमांवर आवाहन करण्याची वेळ आली होती. सुदैवाने रात्री एक वाजता पर्यायी ऑक्सिजनची व्यवस्था झाल्याने रुग्णांचा जीव वाचला आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नसल्याने आता पालिका प्रशासनाने या रुग्णालयातील रुग्णांची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर जे रुग्ण बाहेर उपचारासाठी गेले आहेत, त्यांना या रुग्णालयात प्रवेश न देण्याची वेळ आली आहे. शासनामार्फत ऑक्सिजनविषयी हमी मिळत नाही, तोपर्यंत नवीन रुग्णांना न घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
........................