जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
By सुरेश लोखंडे | Published: November 25, 2023 05:44 PM2023-11-25T17:44:30+5:302023-11-25T17:46:18+5:30
आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येथील जिल्हा परिषद अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ गांवखेड्यांच्या ग्राम पंचायतींमध्ये आजपासून सुरू झाला आहे. यास अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात लाभला आहे. आजपासून सुरू झालेल्या या माेहिमेला ४३१ ग्राम पंचायतींपैकी चार ग्राम पंचायतींनी प्रारंभ केला आहे.
भिवंडी तालुक्यातील अस्नोली ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, इतर शासकीय विभागांचे अधिकारी, शासकीय लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी केले. संकल्प यात्रेच्या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी हाेउन गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन ठाेंबरे यांनी ग्रामस्थांना यावेळी केले.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत पोहोचण्याच्या उद्देशाने ही "विकसित भारत संकल्प यात्रा" आजपासून २४ जानेवारपर्यंत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या ४ डिजिटल स्क्रीन असलेल्या व्हॅन सज्ज करण्यात आल्या आहेत. त्या जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायती क्षेत्रात जनजागृती करणार आहेत. त्यापैकी भिवंडी,तालुक्यातील अस्नोलीसह शहापूरच्या बारेशती ग्रामपंचायत, अंबरनाथच्या पोसरी, कल्याणच्या जांभूळ आदी चार ठिकाणी आज सकाळच्या सत्रात या यात्रेचा शुभारंभ झाला.