शहापूर न्यायालयात ई-ग्रंथालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:50 AM2021-09-16T04:50:32+5:302021-09-16T04:50:32+5:30
शहापूर : ई-ग्रंथालये म्हणजे वकिलांच्या कामातील आधुनिकीकरणाचा एक टप्पा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲड. गजानन चव्हाण ...
शहापूर : ई-ग्रंथालये म्हणजे वकिलांच्या कामातील आधुनिकीकरणाचा एक टप्पा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲड. गजानन चव्हाण यांनी केले. येथील दिवाणी आणि फाैजदारी न्यायालयात वकील संघटनेच्या वतीने ग्रंथालय आणि ई-ग्रंथालयाची सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली. त्या ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले की, न्यायपालिकेवर आजही सर्वसामान्यांचा विश्वास आहे. हा विश्वास कायम ठेवण्याकामी न्यायालयात सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व वकील करत असतो. म्हणून प्रत्येक वकिलाने न्यायव्यवस्थेत काम करत असताना आपल्या पक्षकाराची बाजू अभ्यासपूर्ण मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. न्यायपालिकेचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक वकिलाचे आद्यकर्तव्य आहे. ग्रंथालय आणि ई-ग्रंथालय उभारण्यासाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत गडकरी, ॲड. जगदीश वारघडे, ॲड. शिरीष पाटील, ॲड. वैभव खिस्ती, ॲड. अल्पेश भोईर, ॲड. राजेंद्र धारवणे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. प्रमोद पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत गडकरी, शहापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आशिष वामन, जगदीश वारघडे, महेश डौले, अर्चना भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. विजय दिवाणे आणि ॲड. सेवक उमवणे यांनी केले.