मुंबई विरुद्ध बंगाल 'सामना', माजी कर्णधार दिलीप वेंगसरकरांच्या हस्ते उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 12:31 PM2020-01-05T12:31:50+5:302020-01-05T12:33:57+5:30
आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टीवरील मैदानात क्रिकेट सामनेच आयोजित करावे : दिलीप वेंगसरकर
ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह हे क्रिकेटसाठी उत्तम अशी खेळपट्टी असलेले मैदान आहे, या मैदानात फक्त क्रिकेटच खेळले पाहिजे. उत्तम असे व्यासपीठ ठाण्यातील क्रिकेटप्रेमीना या खेळपट्टीच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. अनेक वर्षानंतर या ठिकाणी प्रथम श्रेणीचा सामना होत असून यापुढेही असे सामने येथे खेळविले गेले पाहिजे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेगसरकर यांनी व्यक्त केले.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयो जित केलेल्या या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन नाणेफेक करुन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तब्बल 25 वर्षानी ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात सी.के. नायडू चषक (प्रथम श्रेणी) हा सामना खेळविला जात आहे. या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगरसेविका परिषा सरनाईक, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहंग सरनाईक, नदीम मेमन, माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर नरेश म्ह्सके यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहातील क्रिकेटची खेळपट्टी ही नदीम मेमन यांच्या संकल्पनेतून आंतराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. तब्बल 25 वर्षांनी या खेळपट्टीवर प्रथम श्रेणीचा हा मुंबई विरुध्द बंगाल सामन्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य विहंग सरनाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. 5 ते 8 जानेवारी दरम्यान हा सामना खेळविला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
बीसीसीआयचे आभार : महापौर नरेश म्हस्के
दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहाची खेळपट्टी ही आंतराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात आली आहे. बीसीसीआयने सी.के.नायडू हा 23 वर्षाखालील क्रिकेटपटूंचा मुंबई विरुध्द बंगाल असा सामना ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आयोजित केला ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले व बीसीसीआयचे आभार व्यकत केले.