मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन; तर प्रवेशद्वाराबाहेर भाजपाच्या माजी आमदाराचे आंदोलन
By धीरज परब | Published: October 11, 2022 11:05 PM2022-10-11T23:05:07+5:302022-10-11T23:05:55+5:30
शहराचे पहिले नाट्यगृह शासनाने विकासकाला टीडीआर मंजूर केल्याने बांधून पूर्ण झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.
मीरारोड - मीरा भाईंदर शहराच्या पहिल्या नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहात होत असताना प्रवेशद्वारा बाहेर मात्र भाजपाचे माजी आमदार व माजी नगरसेवकांनी प्रवेशावरून निषेध करत पत्रिका फाडल्या व प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
शहराचे पहिले नाट्यगृह शासनाने विकासकाला टीडीआर मंजूर केल्याने बांधून पूर्ण झाले. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु झाला असताना कार्यक्रमासाठी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे माजी महापौर ज्योत्सना हसनाळे व डिंपल मेहतां सह काही माजी नगरसेवक सह आले. नाट्यगृहात आसन व्यवस्था फुल्ल होऊन गर्दी झाली असल्याने प्रवेशद्वारावर कोणालाच सोडले जात नव्हते.
पोलिसांनी आत गर्दी झाल्याने निमंत्रण पत्रिकेवर नाव असलेल्या मेहता व माजी महापौरांना आत सोडण्यास तयारी दर्शवली. पण माजी नगरसेवकांसह अन्य काही कार्यकर्ते असल्याने त्यांना मात्र सोडण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या मेहता, हसनाळे व माजी नगरसेवक आदी प्रवेशद्वारा बाहेरच खाली बसले. त्यांनी पालिकेच्या निमंत्रण पत्रिका फाडून फेकल्या. प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे आदी अधिकाऱ्यांनी येऊन त्यांना समजवण्याचा व आत जागा उपलब्ध करून देतो असे सांगितले. मात्र मेहता आणि त्यांचे समर्थक निषेध करण्यावर ठाम होते. पालिका व पोलीस प्रशासनाच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असा आरोप मेहता समर्थकांनी केला.
तर निमंत्रण पत्रिकेत नावे होती त्यांना आत पोलीस सोडण्यास तयार होते. बाकीच्यां बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन जागेचा प्रश्न सुटला असता. मात्र सामंजस्य न दाखवता कार्यक्रमाला गालबोट लावत गोंधळ घालणे चांगल्या प्रसंगी अशोभनीय व बेजबाबदारपणाचे आहे. अश्या गोंधळींवर कारवाई व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुद्धा जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.