समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई! कसारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोबदल्याची अजूनही पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:56 IST2025-04-18T11:55:47+5:302025-04-18T11:56:33+5:30
असंख्य शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा मोबदला अजूनही प्रलंबित असल्याने या उदघाट्नाला महाराष्ट्र दिनी मोठा विरोध होणार आहे.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची लगीनघाई! कसारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोबदल्याची अजूनही पंचाईत
कसारा, शाम धुमाळ |
येत्या १ मे महाराष्ट्र दिनी नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गचा अखेरचा टप्पा इगतपुरी ते भिवंडी हा ७५ किमी अंतराचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रगतीपथावर सुरु असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तारीख व वेळ देखील मिळाली असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. रस्ता खुला करण्याची घाई जरी महामंडळ करत असले तरी शहापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनींचा मोबदला अजूनही प्रलंबित असल्याने या उदघाट्नाला महाराष्ट्र दिनी मोठा विरोध होणार आहे.
इगतपुरी ते भिवंडी या ७५ किलोमीटर कामाला सर्वात जास्त कालावधी लागला आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गची घोषणा झाल्यापासून जमिनीच्या खरेदी - विक्रीला विरोध करत जनआंदोलन उभे केले होते. वाढत्या विरोधाला शांत करण्यासाठी त्यावेळेचे पालकमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात समृद्धी महामार्गाच्या जमिनीचे पैसे जमा होतं नाही तोपर्यंत सब रजिस्टर कार्यालयातच अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत थांबवण्याचा फंडा वापरत तालुक्यातील जनतेला शासनाबाबत जागरूक करत जमिनी खरेदी - विक्रीला चालना दिली होती. मात्र तदनंतर जमिनी खरेदी - विक्रीचा सावळागोंधळ पाहवयास मिळाला व याचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील आदिवासी, कातकरी, दलित समाजातील शेतकऱ्यांना बसला तर काही व्यापाऱ्यांना देखील यांचा फटका बसला.
नावाला तालुका पेसा, मात्र आदिवासी मोबदल्यापासून अलिप्त
शहापूर तालुका हा पेसामध्ये मोडत असल्याने तालुक्यातील बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे. त्यातच येथे येणारे अधिकारी, कर्मचारी हे देखील आदिवासी समाजाचे आहेत. असे असताना देखील नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गत अनेक आदिवासी कुटुंबाच्या शेतजमिनी बाधित झालेल्या आहेत त्यातील अनेक कुटुंबाना अजूनही मोबदला मिळाला नाही, विशेष म्हणजे तालुक्यातील भूमिहीन आदिवासी कुटुंबाच्या कल्याणासाठी व आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी शासनाने त्यांना जमिनी दिलेल्या आहेत. त्यांचे वनहक्क दावे मंजूर होऊन वनपट्टे देखील जाहीर झालेले आहे. असे असताना देखील मागील सात वर्षांपासून या आदिवासी कुटुंबांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी शासनाचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. तालुक्यातील वाशाळा, फुगाळे, कसारा बु, शेलवली या गावातील बाधित ग्रामस्थांचे वनहक्क दावे मंजूर असून त्यातील काही शेतकऱ्यांकडे सनद देखील आहेत तरीसुद्धा हक्काच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडावे लागत आहे. यांचसोबत अनेक व्यापारी व शेतकऱ्यांच्या वादातील प्रकरणांचा आर्थिक मोबदला भूसंपादन अधिकारी यांनी न्यायालयात जमा केल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. गुरुवारी सकाळपासून फुगाळे व वाशाळा गावातील समृद्धी बाधित आदिवासी शेतकऱ्यांनी फुगाळा बोगदा येथे ठिय्या आंदोलन सूरु केले असून जोपर्यंत जमिनीचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.
शासनाकडून आमची घोर फसवणूक होत असल्याने आम्ही गुरुवार पासून फुगाळे वाशाळा येथील सर्व शेतकरी कुटुंब वाशाळा बोगद्या जवळ या आंदोलनाला बसलो असून जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही - एकनाथ भला, फुगाळे शेतकरी.