स्मार्ट बसस्थानकांच्या लोकार्पणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:48 AM2021-03-01T04:48:11+5:302021-03-01T04:48:11+5:30
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उच्च प्रतीचे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी बसथांबे केडीएमटीकडून उभारण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तुटलेले, गंजलेले ...
कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उच्च प्रतीचे स्टेनलेस स्टीलचे प्रवासी बसथांबे केडीएमटीकडून उभारण्यास सुरुवात झाली आहे. सध्या तुटलेले, गंजलेले अशा दयनीय अवस्थेतील बसथांबे शहरातील विविध भागांमध्ये पाहायला मिळतात. आता हे चित्र बदलणार आहे. भवानी चौकात आणि वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे परिवहन आगाराच्या समोर उभारण्यात आलेल्या बसथांब्यांचे लोकार्पण शनिवारी झाले.
कल्याण-डोंबिवली शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झालेला असून केडीएमसीने त्यांच्या स्तरावर पूर्ण शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास, व्यवस्थापन आणि सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली आहे. परिवहन उपक्रम हा नागरिकांना वाहतूक सेवा पुरवणारा उपक्रम असल्याने ‘वाहतूक व्यवस्थापन’ याअंतर्गत परिवहन उपक्रमाची भूमिका स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये महत्त्वाची राहणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रेल्वेस्थानक परिसरातील बसथांब्यांची उभारणी त्यांच्या वतीने केली जाणार आहे. त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अन्यत्र बसथांब्यांची उभारणी केडीएमटी उपक्रमांतर्गत केली जाणार आहे. केडीएमसी परिक्षेत्रात १५० नवीन बसथांबे उभारण्यात येणार आहेत. अखेर या बसथांब्यांच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. बीओटी तत्त्वावर हे निवारे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. कल्याण पश्चिमेतील भवानी चौक आणि वसंत व्हॅली येथील बसथांब्यांचे लोकार्पण शनिवारी झाले. यावेळी परिवहन सभापती मनोज चौधरी, संजय राणे, संजय पावशे, कल्पेश जोशी, सुनील खारूक, स्वप्निल काटे, बंडू पाटील, संजय मोरे, दिनेश गोर या सदस्यांसह उपक्रमाचे व्यवस्थापक मिलिंद धाट, आगार व्यवस्थापक संदीप भोसले, स्थानिक नगरसेविका शालिनी वायले आणि समाजसेविका अनघा राजेंद्र देवळेकर आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------
उपक्रमाला प्रतिमहा भाडे मिळणार
कंत्राटदाराला जाहिरातीचे हक्क प्रदान करण्यात आले आहेत. कंत्राटदार केडीएमटी उपक्रमाला प्रतिमहा भाडे देणार आहे. याकामी अनुभवी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला ऑगस्ट २०१९च्या परिवहन समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली होती. संबंधित प्रस्तावानुसार बसथांब्यांची डागडुजी करणे, रंगरंगोटी करणे, फ्लोरिंग दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यकतेनुसार नवीन बसथांबे उभारणी करणे आदी जबाबदारीही कंत्राटदाराची राहणार आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे