उल्हासनगरात संततधार पाऊस, नालेसफाईचा बोजवारा, अनेक ठिकाणी साचले पाणी
By सदानंद नाईक | Published: June 20, 2024 03:35 PM2024-06-20T15:35:27+5:302024-06-20T15:36:19+5:30
संततधार व रिमझिम पावसामुळे शांतीनगर स्मशानभूमी, कल्याण-बदलापूर रस्ता, गोलमैदान, विदर्भवाडी आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते.
उल्हासनगर : संततधार व रिमझिम पावसामुळे शांतीनगर स्मशानभूमी, कल्याण-बदलापूर रस्ता, गोलमैदान, विदर्भवाडी आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. नालेसफाई न झाल्याने, पाणी तुंबल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून शाळा क्रं-१४ येथे एक झाड पडल्याची घटना घडली आहे. तर रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे.
उल्हासनगरात सकाळपासूनच रिमझिम व संततधार पाऊस सुरू झाल्याने, शहरातील सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. शांतीनगर स्मशानभूमीच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने, काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. महापालिका कर्मचारी व अग्निशमन विभागाने तुंबलेल्या पाण्याला मार्ग मोकळा केला. शहरातील कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या स्टेट बँक, राधास्वामी सत्संग, अनिल-अशोक चित्रपटगृह व शांतीनगर प्रवेशद्वार आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. याव्यतिरिक्त गोलमैदान, गुलशननगर, खेमानी रस्ता, मयूर हॉटेल व आयआयटी कॉलेज रस्ता आदी ठिकाणी पाणी साचले. वेळीच नालेसफाई न झाल्याने शहराची तुंबापुरी झाल्याचा आरोप होत आहे. तसेच रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी न भरल्याने, रस्ते खड्डेमय झाले असून याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे.
गायकवाड पाडा नाला खोदल्याने नागरिक त्रस्त
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गायकवाड पाडा येथील एक लहान नाला खोदल्याने, नागरिकांसह शाळेकरी मुलांना नाल्यावरील पाईपवरून नाला ओलांडून जावे लागत आहे. संततधार पाऊस सुरू राहिल्यास, एकदी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.