डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे झाडं कोलमडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 08:45 AM2019-08-04T08:45:40+5:302019-08-04T08:46:57+5:30

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते ही पाण्याखाली गेले असून येथील नांदिवली परिसरातील मठाच्या आवारातील  पुरातन वृक्ष कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

Incidence of falling trees due to heavy rains in Dombivali | डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे झाडं कोलमडली

डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे झाडं कोलमडली

Next

कल्याण -  डोंबिवलीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सर्वाधिक फटका डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागाला बसला आहे. येथील मिलापनगर, तलाव रोड या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून येथील काही बंगल्यांमध्येही  पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. येथील काही सोसायट्यांच्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्स पर्यन्त पाणी आले आहे. असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती अजून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकुर्ली रेल्वे यार्ड आणि पूर्वीचे पॉवरहाऊस मध्ये काही ठिकाणी  खाडीचे पाणी जमले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते ही पाण्याखाली गेले असून येथील नांदिवली परिसरातील मठाच्या आवारातील  पुरातन वृक्ष कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. नांदीवली टेकडीवर जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील खाडीलगतच्या चाळींमध्येही पाणी शिरले आहे कल्याण पश्चिमेतील खाडी परिसर असो अथवा पुर्वेतील सखल भाग याठिकाणच्या घरांमध्येही पाणी जायला सुरुवात झाली आहे. पूर्वेतील एफ केबीन वालधुनी या भागालाही पावसाचा फटका बसला आहे. 

भरतीच्या वेळी खाडीलगतच्या परिसरात पाणी वाढल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. कल्याणमध्ये ‘क’ प्रभागातील चौधरी मोहल्ला येथील धोकादायक बनलेले एक घर पडले. परंतु, त्यात कोणतीही हानी झाली नाही. तसेच बाधित कचोरे येथील काही घरांवर शुक्रवारी रात्री दरड कोसळली असून, तेथील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.

जे प्रभागातील अतिधोकादायक असलेल्या ‘समाधान’ या इमारतीचा काही भाग शुक्रवारी कोसळला. त्यामुळे त्यातील पाच कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. दुसरीकडे कल्याण तालुक्यातील २२ गावांचा संपर्क तुटला. आठवड्यात तिसºयांदा कल्याण-मुरबाड महामार्ग पाण्याखाली गेला. उल्हास नदीची पातळी वाढल्याने रायता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.

या मार्गावरील वाहतूक गोवेली-आंबिवली-शहाडमार्गे कल्याण अशी वळवण्यात आली. रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल शनिवारी सकाळी सहाव्यांदा पाण्याखाली गेला. तसेच येथील वासुंद्री गावाजवळील पुलालाही पाणी लागले
असून तोही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Incidence of falling trees due to heavy rains in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस