केडीएमसी हद्दीत रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:50 AM2020-08-08T00:50:25+5:302020-08-08T00:50:48+5:30
आयुक्तांची माहिती : मृत्युदर १.८ टक्क्यांवर, नागरिकांना दिलासा
कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. तसेच रुग्णदुपटीचा दर हा ५२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. तो येत्या काळात ६० दिवसांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती तूर्तास तरी नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिली.
सध्या दिवसाला नवीन २५० नवे रुग्ण आढळत आहेत. केडीएमसी हद्दीत कोरोनामुळे मृत्यूचा दर हा १.८ टक्के असून, तो अन्य महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांना सुविधा पुरविण्यात काही मर्यादा होत्या. त्यावेळी काही व्यवस्थाच नव्हती. आता कोरोना रुग्णांसाठी ६०० खाटांची सुविधा आहे. त्यामुळे आता रुग्णांसाठी खाटांची वानवा नाही. सध्या बेड रिक्त आहेत, असे चित्र आहे. त्यामुळे खाटांसाठी रुग्णांना जास्त वेळ भटकंती करण्याची गरज भासत नाही, असे सूर्यवंशी म्हणाले.
कोरोना रुग्णांसाठी कल्याणमधील गौरीपाडा येथे पीपीई तत्त्वावर क्रेष्णा डायग्नोस्टिकने सुरू केलेल्या टेस्टिंग लॅबमुळे रुग्ण चाचणीचा दर वाढला आहे. दिवसाला एक हजार रुग्णांची चाचणी केली जात असून, त्याचा अहवालही आठ ते नऊ तासांत मिळत आहे. त्यामुळे त्याच दिवशी पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर ‘फॅमिली डॉक्टर कोविड फायटर’ या मोहिमेंतर्गत रुग्णांची तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले.
दिवसाचा हजार अॅण्टीजेन चाचणीचा मानस
च्अॅण्टीजेन टेस्टचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला एक हजार अॅण्टीजेन चाचण्या करण्याचा डॉक्टरांचा मानस आहे. प्रत्येक प्रभागातही रुग्णांचे स्क्रिनिंग सुरू आहे.
च्आरटीपीसी कोरोना टेस्ट व अॅण्टीजेन टेस्ट करण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोना चाचणीपश्चात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर यापूर्वी ४१ टक्के होता. आता तो कमी होऊन २१ टक्क्यांवर आला आहे, असे आयुक्तांनी सांगितले.