डीपीसी कार्यालयाच्या आवारात स्फोटके, कल्याणमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:28 AM2018-09-29T04:28:17+5:302018-09-29T04:28:55+5:30
पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि प्रांत कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षात शुक्रवारी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या.
कल्याण - पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) आणि प्रांत कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या एका रिक्षात शुक्रवारी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या सापडल्या. याप्रकरणी कसून तपास सुरू असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.
खडकपाडा परिसरात एकाच इमारतीत कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय आणि प्रांत अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावातून जमिनीच्या कामासाठी शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास प्रांत अधिकारी कार्यालयात एका रिक्षातून तीन महिला आल्या होत्या. इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला त्यांची रिक्षा उभी करण्यात आली होती.
दरम्यान, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात निनावी मिळालेल्या चिठ्ठीत कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या रिक्षात स्फोटके ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. तातडीने या रिक्षाचा तपास केला असता, त्यातील एका डब्यात जिलेटिनच्या दोन कांड्या आणि चार डिटोनेटर आढळून आले. यावेळी बॉम्बशोधक आणि नाशक पथक, श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
महिला, रिक्षाचालकाची चौकशी
संबंधित महिलांचा जमिनीचा वाद सुरू असल्याने कट रचून महिला आणि रिक्षाचालकाला फसवण्यासाठी ही स्फोटके ठेवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महिला आणि रिक्षाचालकाकडे चौकशी सुरू असून सध्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.