ठाण्यातील घटना: अपघातानंतर एक तास रुग्णवाहिका न मिळाल्याने बांधकाम ठेकेदाराच्या मुलाचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 02:04 AM2020-07-06T02:04:10+5:302020-07-06T02:14:10+5:30
ठाण्यात मात्र अपघातानंतर तासभर वाट पाहूनही वेळेत रुग्णवाहिका न मिळू शकल्याने कल्पेश शिवाजी गायकवाड (२६, रा. पाचपाखाडी, ठाणे) या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रसिद्ध ठेकेदार शिवाजी गायकवाड यांचा तो मुलगा होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचा रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यु ओढवत असल्याच्या अनेक घटना घडत आहे. ठाण्यात मात्र अपघातानंतर तासभर वाट पाहूनही वेळेत रुग्णवाहिका न मिळू शकल्याने कल्पेश शिवाजी गायकवाड (२६, रा. पाचपाखाडी, ठाणे) या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पेश हा बाहेर चक्कर मारुन येतो असे सागून कल्पेश रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पाचपाखाडीतील सिद्धी टॉवर येथील घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मुंबई- नाशिक पूर्व द्रूत गती मार्गावरील उड्डाण पूलावरुन भरघाव वेगातच तो मुंबईच्या दिशेने जात होता. पूलावरुन उतरल्यानंतर सेवा रस्त्याकडे वळत असतांनाच तुळजाभवानी मंदिारासमोर त्याची कार आली. त्यावेळी भरघाव वेगात असल्यामुळे कारवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने दोन वेगवेळया झाडांवर आदळून दुभाजकाला धडकून पदपथावर कार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, तो कारच्या बाहेर फेकला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बराच वेळ रस्त्यावरच होता. नंतर काही नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तिथून जाणाऱ्या काही रुग्णवाहिकांनाही हाताने इशारा केला. मात्र, १०.४० ते ११.४८ या एक तासाच्या अवधीमध्ये तिथून गेलेल्या तीनपैकी एकही रुग्णवाहिका त्याठिकाणी थांबली नाही. याच दरम्यान, नौपाडा पोलिसांच्या बिट मार्शलनेही रुग्णवाहिका थांबविण्याचा प्रयत्न केला. अखेर ११.४८ वाजण्याच्या सुमारास आलेल्या एका रुग्णवाहिकेमधून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी दिली. हयगयीने वाहन चालवून स्वत:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कल्पेशविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रसिद्ध ठेकेदार शिवाजी गायकवाड यांचा तो मुलगा होता. कल्पेशच्या अचानक अपघाती मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे.