लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंब्र्यात कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:06+5:302021-09-27T04:44:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जून महिन्यापासून राज्यात टप्प्याटप्प्यात लाॅकडाऊन शिथिल करण्यात आला. यामुळे एकीकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जून महिन्यापासून राज्यात टप्प्याटप्प्यात लाॅकडाऊन शिथिल करण्यात आला. यामुळे एकीकडे सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच मुस्लिमबहुल मुंब्र्यात आर्थिक तसेच इतर किरकोळ कारणांवरून कौटुंबिक वादाच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांमध्ये कौटुंबिक कटुता न येता समेट घडवून आणण्यासाठी स्थानिक पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. काही वेळा दोन्ही पक्षांचे संबंध समेट घडवून आणण्याच्या पलीकडे ताणले गेल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्दशनास येते. समेट घडवण्याऐवजी दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेतली जाते. अशा प्रकरणांमध्ये चार्जशिट दाखल केली जात आहे.
कौटुंबिक वादाप्रमाणेच मागील काही दिवसांमध्ये येथील विविध भागांमधून मुली स्वत:हून पळून गेल्याच्या घटनादेखील काही प्रमाणात वाढल्या आहेत. आतापर्यंत घरातून पळून गेलेल्या मुलींचा तीव्र गतीने तपास करून पोलिसांनी त्यांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. येथील अमली पदार्थ विक्रीला पूर्णपणे आळा बसावा, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम सुरू करण्यात आहे. याअंतर्गत मागील काही दिवसांमध्ये येथील विविध भागांमध्ये गांजा, चरस, कफसिरफ आदी अमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक करून त्यांनी विक्रीसाठी आणलेले ९६ हजार ४३३ रुपयांचे विविध प्रकारचे अमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात विविध वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीला गेलेल्या वाहनांपैकी काही वाहने बेवारस स्थितीमध्ये आढळून आली आहेत. पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून चोरीला गेलेल्या २५ टक्के वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.