केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच महिला असुरक्षित, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या
By नितीन पंडित | Published: September 2, 2022 03:46 PM2022-09-02T15:46:42+5:302022-09-02T15:47:40+5:30
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याच महामार्गावर मानकोली उड्डाणपूल ते खरेगाव टोल नाका या भागात या चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
भिवंडी:
भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याच महामार्गावर मानकोली उड्डाणपूल ते खरेगाव टोल नाका या भागात या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या बंगल्या समोरूनच दुचाकीवरून पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून या चोरी प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता केंद्रीय मंत्र्यांच्या घराजवळच महिला असुरक्षित असल्याने केंद्रीय मंत्री व पोलीस यंत्रणा याकडे आतातरी लक्ष देणार का? असा सवाल महिला व नागरिक विचारत आहेत.
कल्याण येथे राहणारी महिला वैशाली सुधीर वाळंज या आपल्या पतीसह दुचाकीवरून गुरुवारी रात्री घरी जात असताना खारेगाव ब्रिज नंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घराजवळ एका बाईक स्वाराने त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या प्रकरणी महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.