झाडांच्या संगोपनावर गुण देण्याच्या योजनेचा शैक्षणिक धोरणात समावेश करा; २५ वर्षांचा तरुण करतोय १६ हजार किमीचा पायी प्रवास
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 7, 2023 07:17 PM2023-11-07T19:17:46+5:302023-11-07T19:20:02+5:30
४ डिसेंबर २०२२ रोजी अयोध्यावरुन आशुतोषने आपला पायी प्रवास सुरू केला.
ठाणे : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना एक झाड देऊन त्या झाडाचे दरवर्षी कशाप्रकारे संगोपन केले आहे यावर त्यांना गूण देण्यात यावे आणि या योजनेचा शैक्षणिक धोरणात समावेश करण्यात यावा यासाठी तसेच, वाढत चाललेले हवा प्रदूषण याला आळा घालण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या जंगलात वृक्षांचे रोपण व्हावे यासाठी अयोध्यावरुन निघालेला २५ वर्षांचा तरुण १६ हजार किमीचा पायी प्रवास करीत आहे. तसेच, प्रत्येक शाळेमध्ये वृक्षारोपण करीत आहे. आतापर्यंत त्याने ९४०० किमीची पदयात्रा पूर्ण करुन २३०० वृक्षांचे रोपण शाळाशाळांमध्ये केले आहे. आशुतोष पांड्ये असे या तरुणाचे नाव आहे.
४ डिसेंबर २०२२ रोजी अयोध्यावरुन आशुतोषने आपला पायी प्रवास सुरू केला. संपूर्ण देशांतील शाळआंमध्ये दहा हजार वृक्षांचे रोपण करण्याचा ध्यास त्याने घेतला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, ओडीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असे १२ राज्य त्याने केले असून पुढे त्याला गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरयाणा, पंजाब, कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि परत उ. प्रदेश
या राज्यात पदयात्रा पूर्ण करणार आहे. २०२६ मध्ये त्याची ही पदयात्रा पूर्ण होणार आहे. आयेध्येत पोहोचल्यावर त्या वर्षात एकाच दिवशी एक लाख झाडे लावण्याचा संकल्प त्याने केला आहे. यासाठी तो विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमींना सहभागी करुन घेणार आहे. ९४०० किमीच्या प्रवासात त्याने ४ मुख्यमंत्री, सात वनमंत्री, ६८ जिल्हाधिकारी यांची भेट घेतली तर ९७ शाळांमध्ये सेमीनार घेऊन तब्बल ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. १५०० गाव आणि ६४ जिल्ह्यांत त्याचा प्रवास झाला आहे.
१९५२ साली आपल्या देशाची लोकसंख्या ३६ करोड होती. ती आता १५२ करोडोच्या घरात गेली आहे. सिमेंट काँक्रीटचे जंगले उभी राहू लागली आहे. झाडांची कत्तल होऊ लागली आहे. अशातच अशा पर्यावरणाला जोडणाऱ्या शैक्षणिक धोरणाची आवश्यकता असल्याचे आशुतोष याने सांगितले. मी नोकरीतून राजीनामा देऊन पर्यावरण वाचविण्याची ही चळवळ हाती घेतल्याचेही त्याने सांगितले. काल ठाण्यात आल्यावर स्वत्वचे श्रीपाद भालेराव यांनी त्यांच्या घरी आशुतोषची निवास व्यवस्था केली होती.