एसआरएसाठी १५२४ एकरांवरील २६५ झोपडपट्ट्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:55 AM2019-02-01T00:55:03+5:302019-02-01T00:56:22+5:30
तीन भागांत विभागणी; वांद्रे येथून वरिष्ठांकडून कामकाज
- सुरेश लोखंडे
ठाणे : ‘झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण’ या प्रकल्पात गोंधळ होऊन पात्र रहिवाशांना डावलल्याच्या तक्रारी आहेत. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी दोन वर्षांपासून महापालिकेच्या या एसआरडीएऐवजी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात ‘एसआरए’ हा स्वतंत्र विभाग सुरू आहे. याद्वारे एक हजार ५२४ एकरांच्या भूखंडांवरील २६५ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होत आहे. यासाठी त्या तीन ( झोन) भागांत विभागल्या आहेत. त्यांचे काम वांद्रे येथील वरिष्ठांकडून (सीईओ) सुरू आहे.
महापालिकेद्वारे राबवण्यात आलेला ‘स्लम रिहॅबिटेशन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ (एसआरडीए) प्रकल्प आता स्लम रिहॅबिटेशन अॅथॉरिटी’ (एसआरए) या नावे राबवला जात आहे. एसआरडीएतील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ होऊन बोगस रहिवाशांचा समावेश झाल्याचे आरोप झाले. पात्र झोपडपट्टीमालकास वंचित ठेवल्याच्या आरोपामुळे एसआरडीए प्रकल्प अडचणीत आला. आता त्यावरील महापालिकेचे नियंत्रण दूर करण्यात आले. एसआरडीए प्रकल्पामधील गोंधळामुळे अन्याय झालेल्या रहिवाशांच्या तक्रारींवर सध्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेऊन सत्यता पडताळून घेतली जात आहे.
सीईओच्या नियुक्त्या रखडल्या
हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबवण्यासाठी तीन भागांत विभागला आहे. त्यांची जबाबदारी तीन उपजिल्हाधिकाऱ्यांवर स्वतंत्ररीत्या देण्यात आली आहे. ठाण्यासह मुंबईनगर व उपनगरांमधील ‘एसआरए’ प्रकल्पांसाठी तीन सीईओपदांची नियुक्ती होणे अपेक्षित आहे. काही महिन्यांपासून या नियुक्त्या रखडल्या आहेत. या कामांचा ताण बांद्रा येथील कार्यालयावर पडत आहे.
असे आहे विभाजन : शहरातील एक हजार ५२४ एकरांवर या २६५ झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. एसआरए प्रकल्पासाठी पात्र ठरलेल्या या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाची कामे तीन भागांत विभागली आहेत. यातील पहिल्या विभागात चेंदणी, कोपरी, ठाणे, माजिवडा, पाचपाखाडी या परिसरांतील झोपडपट्ट्यांचा समावेश आहे, तर माजिवड्यातील पाटीलपाडा, चितळसर, मानपाडा, बाळकुम, ढोकाळी, ओवळा, कासारवडवली, बोरिवडे, कावेसर, मोघरपाडा, भार्इंदरपाडा आणि येऊरचा दुसºया टप्प्यात समावेश असून कळवा, खारीगाव, पारसिक, मुंब्रा, कौसा, सोनखर, दिवा, सावे, आगासन, दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, डोमखार, डावले, देसाई, सागर्ली, पडले, डायघर, खिडकाळी आणि शीळ आदी ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा तिसºया विभागात समावेश आहे. त्यांना एसआरएमध्ये समाविष्ट करून घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी सर्वेक्षणाच्या कामाने जोर धरला आहे.