लाक्षणिक संपात जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश
By सुरेश लोखंडे | Published: February 16, 2023 07:16 PM2023-02-16T19:16:44+5:302023-02-16T19:17:14+5:30
लाक्षणिक संपात ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश.
ठाणे : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी एक दिवसाचा लाक्षणिक संप आज पार पडला. यात येथील बा.ना. बांदोडकर विज्ञान कॉलेजसह बेडेकर कॉलेज, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्य शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही आजच्या या लाक्षणिक संपात सहभाग घेतला. याची दखल न घेतल्यास २० फेब्रुवारीपासून अकृषी विद्यापिठे व संलग्न महाविद्यालयांचा बेमुदत संप पुकारण्याचा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखालील या संपात ठिकठिकाणच्या प्रवेशव्दारावर एकत्र येऊन मागण्यांसाठी घोषणा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून विविध मार्गानी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. त्यातील आज एक दिवशीय लाक्षणिक संप आज करण्यात आला.
जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघानेही या संपातील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व केले. या कर्मचाऱ्यांनी आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जिवीत करण्याच्या मागणीसह १०,२० व ३० लाभाची योजना लागू करावी. सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी, रिक्त पदे त्वरीत भरावीत, जुनी पेन्शन लागू करा आदी तब्बल सहा प्रमुख मागण्यांसाठी या शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी आजच्या लाक्षणिक संपात सहभाग घेतला. ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील या कर्मचारी संघाचे पदाधिकारी दिनेश जाधव,रूपेश मोरे, निलेश पाटील, प्राजक्ता मयेकर, रविंद्र पाटील, आदीं पदाधिकाऱ्यांसह प्रथमेश खापरे, मिलींद ताजणे, सागरसिंग पाटील, नेरश सिंग आणि सुधीर राऊत आदींचा सक्रीय सहभाग आढळून आला.