पालिकेचे उत्पन्न वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:34 AM2017-08-05T02:34:01+5:302017-08-05T02:34:01+5:30
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला टार्गेट दिले असून करांची वसुली न झाल्यास अधिकाºयांचे पगार कपात करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे.
ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक विभागाला टार्गेट दिले असून करांची वसुली न झाल्यास अधिकाºयांचे पगार कपात करण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. त्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होईल, अशी शक्यता वाटत असताना पालिकेने एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत विक्रमी वसुली केली आहे. त्यानुसार, आतापर्यंत विविध करातून पालिकेने ७४४ कोटींचे उत्पन्न मिळवले असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ११९ कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत जकात हाच होता. तो बंद झाल्यानंतर एलबीटी लागू झाली. परंतु, एलबीटी भरण्यास अनेक व्यावसायिकांनी नकार दिला होता. आयुक्तांनी यावर तोडगा काढल्याने हे उत्पन्नदेखील वाढल्याचे दिसून आले. आता जीएसटी लागू झाल्याने पालिकेला मुख्य उत्पन्नाच्या स्रोतासाठी शासनावर अवलंबून राहावे लागणार आहे.
असे असले तरी पालिकेने मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या विविध लाभ करांत तसेच इतर करांमध्येदेखील वाढ केल्याने त्याचा परिणाम पहिल्या चार महिन्यांतच दिसून आला आहे. या काळात ७४४.१७ कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी याच कालावधीत पालिकेच्या तिजोरीत ६२४.७१ कोटी जमा झाले होते.