अवकाळीने आवक घटली; भाजीपाला कडाडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 01:01 AM2019-11-03T01:01:30+5:302019-11-03T01:02:02+5:30
शेतकऱ्यांसह ग्राहकही हवालदिल । पाच बाजार समित्यांत कृषीमाल आलाच नाही
सुरेश लोखंडे
ठाणे : भाजीपाला व अन्नधान्यपुरवठा करणाºया राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांस लागणाºया भाजीपाल्याची आवक घटली आहे. भिवंडी, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी व शुक्रवारी कृषीमालाची आवक झाली नाही. तर, नवी मुंबई व कल्याण बाजार समित्यांमध्ये अवघे ८०७ ट्रक व टेम्पोंद्वारे भाजीपाला, अन्नधान्याची आवक झाली आहे. यामुळे भाज्यांचे भाव कडाडले असून नुकसानीने शेतकरी तर महागाईने ग्राहकही हवालदिल झाला आहे.
राज्यभरात सुरू असलेल्या या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये खरिपाच्या हंगामासह भाजीपाला, कडधान्य, कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी, नाल्यांना पूर असल्यामुळे शेतकºयांना शेतातही जाणे शक्य होत नाही. काही ठिकाणी तर रस्ता उपलब्ध असला तरी ट्रक, टेम्पो शेतीतील चिखलात फसण्याची शक्यता आहे. तसेही शेतात चिखल असल्यामुळे पाय ठेवणेही शक्य नाही. त्यात संध्याकाळी जीवघेणा अवेळी पाऊस विजेच्या कडकडाटात पडत आहे. यामुळे अंगावर वीज पडण्याची भीती असल्यामुळे शेताकडे जाणे जीवावर बेतत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेकर जनतेसाठी होणारी ताज्या भाजीपाल्याची आवक घटली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह अन्यही ठिकाणी भाजीपाला, कांदे, बटाटे, फळे, कृषीमाल नवी मुंबईत अवघा ९३ ट्रक व ६०६ टेम्पो भाजीपाला आला आहे. कल्याणला भाजीपाला अवघे १८ ट्रक, ८१ टेम्पो आले आहेत. कांदा-बटाट्यांचे नऊ ट्रक आणि १३ टेम्पो आले होते.
आवक न झालेल्या भाज्या
नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी मेथी, कोथिंबीर, वांगी, तोंडली, टोमॅटो, ज्वाला व लवंगी मिरचीही आलेली नाही. शेपू, पालक, मुळा, मेथी आदींचीदेखील आवक आज झालेली नाही. याप्रमाणेच भेंडी, भोपळा, चवळी, बीट, घेवडा, पडवळ, टोमॅटोचादेखील एकही ट्रक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच शुक्रवारीही भाजीपाल्याची आवक नव्हती.
पालेभाज्या भाज्यांचे दर
पालक ४०
मेथी ५०
चवळी २५
कोथिंबीर जुडी ८० ते ९०
शेपू ३० ते ४०
मुळा २०
लालमाठ २०
फळभाज्या भाज्यांचे दर
फ्लॉवर १००
कोबी ८०
फरसबी १००
सिमला मिरची १००
गवार १२०
टोमॅटो ६०
तोंडली १००
भेंडी १००
मटार १६०
घेवडा १००
फळभाज्या भाज्यांचे दर
दोडका १००
गाजर १०० ते १२०
काकडी ६०
मिरची १२०
आले २००
अवकाळी पावसामुळे आवक घटली असून यामुळे दर वाढल्याचे विक्रेते संभाजी खेडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.