अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ; वकिलांचाही वकीलपत्र घेण्यास नकार
By पंकज पाटील | Published: August 21, 2024 02:14 PM2024-08-21T14:14:06+5:302024-08-21T14:16:30+5:30
कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे...
बदलापूर : बदलापूर येथे नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर लैंगिंक अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेला पोलिसांनी आज कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तर आता आरोपी अक्षय शिंदेंचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्याचे कळत आहे.
कल्याण न्यायालयातील वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. आरोपीला न्यायालयात आणण्यासाठी न्यायालयाच्या परिसरात चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपीवर हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी ही दक्षता बाळगली होती.
आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण -
बदलापूरमधील या संतापजनक घटनेनंतर, बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केलं रास्ता रोको केला. त्यानंतर आता आज बदलापूरमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे.
कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे. तर शहरातील दुकानं देखील बंद आहेत.