बेदरकार वाहन चालकांना रोखण्यासाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 11:06 AM2021-01-30T11:06:53+5:302021-01-30T11:07:16+5:30
पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचे पालिका आयुक्तांना पत्र
ठाणे – ठाणे शहरातील रस्ते प्रशस्त झाल्याने वाहने वेगाने दामट्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बेदरकार वाहन चालकांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. मनुष्यबळ मर्यादीत असल्याने प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे वाहतूक पोलिसांना शक्य नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या बेदरकारपणाला लगाम घालण्यासह शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्हींचे नेटवर्क वाढविण्याची गरज पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ठाणे पालिका आयुक्त डाँ. विपिन शर्मा यांच्याकडे एका निविदनाव्दारे व्यक्त केली आहे.
२७ जानेवारी रोजी पहाटे उपवन परिसरात टाटा लॅण्ड क्रुझर या गाडीने झाडाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तर, वाहन चालविणारी तरूणी गंभीर जखमी झाली आहे. उपवन, येऊर, नव्याने तयार झालेल्या सुरेंद्र मिल कंपनी समोरचा रस्ता, घोडबंदर रोडरील नव्याने विस्तारणा-या वसाहतींमध्ये रँश ड्रायव्हींग प्रकार सातत्याने वाढू लागले आहेत. या भागात काही मोटारसायकलस्वार स्टंटही करतात. पोलिसांकडे त्याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, या परिसरात कायमस्वरुपी नजर ठेवणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्हींचे जाळे विस्तारल्यास या रस्त्यांवरील प्रत्येक हालचाली पोलिसांना टिपता येतील. वेगाने वाहन दामटणा-या आणि स्टंट करणा-या वाहतूक चालकांवर नियंत्रण ठेवण्यासोबतच सोनसाखळी चोरी किंवा अन्य घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासही पोलिसांना या कँमे-यांची मदत होणार आहे.
या कँमे-यांचे फिड वाहतूक नियंत्रण कक्षाशी जोडले जाईल. त्यामुळे पोलिसांना तिथल्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवणेही शक्य होईल. हे रस्त्यांवरील अपघात नक्की कुणाच्या चुकीमुळे झाला, मानवी चुकांव्यतिरीक्त अन्य कोणती कारणे त्यामागे होती का, भविष्यातील असे अपघात टाळण्यासाठी कोणते प्रयत्न करावे याबाबत पोलिसांनी भूमिका घेणेही सुकर होणार आहे. तसेच, आपल्यावर कँमे-यांची नजर आहे हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर कायद्याचे उल्लंघन करण्याचे प्रकारही कमी होतील, अशी आशा पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांकडून ई चलान पद्धतीने कारवाई केली जाते. सीसीटीव्ही कँमे-यांच्या मदतीने नियम मोडणा-या अशा वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणेही शक्य होईल असेही बाळासाहेब पाटील यांचे म्हणणे आहे.