जमील शेख हत्याकांडातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 11:49 PM2020-12-03T23:49:14+5:302020-12-03T23:53:19+5:30
मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्याकांडातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यातील हल्लेखोरांचा अद्यापही शोध सुरूच असून फरार झालेल्यांपैकी कोणीही तपासपथकाच्या हाती लागले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास राबोडीतील बिस्मिल्ला हॉटेलसमोरून जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी शाहिद शेख या संशयित आरोपीला अटक केली होती. त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या कोठडीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याच्याकडून मोटारकार, कपडे तसेच दुचाकीच्या बनावट क्रमांकाची पाटी या पथकाने हस्तगत केली. जमीलवर गोळी झाडतेवेळी त्यानेच मोटारसायकल चालविली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत
गुरु वारी संपली असली तरी या हत्याकांडातील आणखी फरारी आरोपी तसेच सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. हल्लेखारांनी वापरलेले रिव्हॉल्व्हर आणि मोटारसायकलचाही शोध घेणे बाकी असल्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी गुन्हे अन्वेषण विभागाने गुरु वारी ठाणे न्यायालयात केली. ती मान्य करून त्याला ७ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.