सार्वजनिक ‘आरोग्य’ सेवांमध्ये ‘लोकसहभाग’ वाढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:38 AM2021-03-25T04:38:49+5:302021-03-25T04:38:49+5:30
ठाणे : ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘लोकसहभागी ...
ठाणे : ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘लोकसहभागी आरोग्य नियोजन’ (कम्युनिटी ॲक्शन हेल्थ) हा प्रकल्प राबविला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी बुधवारी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी मार्गदर्शन केले.
सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड या दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबवला जात असून जिल्ह्यासाठी महाराष्ट्र मुलुंड सेवा संघाची मातृसंस्था म्हणून निवड केली आहे. या प्रकल्पातून गावपातळीवरील सार्वजनिक आरोग्य सेवांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. तालुका समन्वयाच्या माध्यमातून वेळोवेळी गावभेटी, प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्रांना भेटी देऊन आरोग्य सेवासुविधांचा सतत आढावा घेतला जाणार आहे. त्याचबरोबर ग्राम आरोग्य पाणीपुरवठा, पोषण व स्वच्छता समिती, रुग्णकल्याण समिती, प्राथमिक देखरेख व नियोजन समिती, कोरोना दक्षता समिती यासारख्या विविध समित्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन गाव ते प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर रुग्णांना सेवा देताना आणि आरोग्ययंत्रणेला सेवा देताना येणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा करून त्या सोडविण्यासाठी या प्रकल्पामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच लोकांमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत मिळणाऱ्या सेवासुविधांबाबत माहिती देऊन लोकांना आरोग्यहक्कामार्फत जागृत करण्यात येणार आहे. आगामी वर्षात मातृसंस्थेच्या सहकार्याने नियोजन करून ही कार्यवाही केली जाणार आहे
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अंजली चौधरी, राज्य मातृसेवा संघ प्रतिनिधी गुरुप्रसाद कालेलकर. जिल्हा मातृसंघाचे प्रतिनिधी विनायक जोगळेकर, राज्य मातृसेवा संघाच्या कानिटकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल बाग, जिल्हा लेखा व्यवस्थापक मनीष खैरनार, जिल्हा समूह संघटक स्वप्नाली मोहिते, जिल्हा रुग्ण कल्याण समिती समन्वयक प्रतिभा निखारे उपस्थित होत्या.