खंडणी, वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ
By admin | Published: February 1, 2016 01:18 AM2016-02-01T01:18:23+5:302016-02-01T01:18:23+5:30
गेल्या वर्षभरात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन चोरी आणि खंडणीच्या गुन्हयांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ठाणे ते उल्हासनगर,
जितेंद्र कालेकर , ठाणे
गेल्या वर्षभरात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन चोरी आणि खंडणीच्या गुन्हयांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ठाणे ते उल्हासनगर, बदलापूरपर्यंत आणि भिवंडी ते कल्याण, डोंबिवलीपर्यंतच्या परिसरातून १६९१ वाहनांची चोरी झाली. त्यातून केवळ ३१३ म्हणजे अवघ्या १९ टक्के वाहनांचा शोध लागला. यात सर्वाधिक १४३६ दुचाकींची चोरी झाली.
दरम्यान, वाहन चोरांबरोबरच खंडणीखोरांनीही पुन्हा डोके वर काढल्यामुळे २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये ५६ गुन्हयांची वाढ झाली असून ११२ पैकी ७१ गुन्हयांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १६९१ वाहनांची चोरी झाली. त्यातील तब्बल १३७८ वाहनांचा (८१ टक्के) अद्यापही शोध लागलेला नाही. यात १४३६ दुचाकी, २११ लहान तर ४४ मोठया वाहनांचा समावेश आहे. २७६ दुचाकी, २९ लहान तर ८ मोठया वाहनांचा शोध घेण्यात आला आहे. २०१४ मध्येही १६४६ पैकी अवघ्या ३१९ अर्थात १९ टक्केच वाहनांचा शोध लागला. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये ४५ वाहने अधिक चोरीला गेली आहेत.
सरकारी नोकरांवर हल्ला होण्याचे दोन्ही वर्षांत १५१ प्रकार घडले. त्यापैकी २०१४ मध्ये १२९ आणि २०१५ मध्ये १२५ गुन्हे उघड झाले. दंगल हाणामारीचे ४२१ पैकी ३५३ (८४ टक्के ) गुन्हे उघडकीस आले. तर २०१४ मध्ये ३५० पैकी ३०८ म्हणजे ८८ टक्के गुन्हयांची उकल झाली होती. दंगल, हाणामारीच्या गुन्हयांमध्ये ७१ ची भर पडली.
राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी ठाणे शहर वाहतूक शाखेच्या डिजीटल नियंत्रण कक्षाला महिनाभरापूर्वी भेट दिली होती. त्यावेळी नियंत्रण कक्ष आणि चौका चौकातील सीसीटीव्हींच्या आधारे वाहन चोरीच्या किमान पाच तरी गुन्हयांचा छडा लावण्यास त्यांनी उपायुक्त रश्मी करंदीकर यांना आदेश दिले होते. विशेष म्हणजे कापूरबावडी नाका येथे एका वाहन चोराला पाठलाग करुन त्याला पकडण्यात वाहतूक शाखेच्या हवालदाराला यशही आले. त्याखेरीज वाहन चोरीचा कोणताही गुन्हा उघड करण्यात यश आलेले नाही.