दिलासादायक! धरणांच्या पाणी पातळीत वाढ. तानसा, मध्य वैतरणामधील पाणीसाठा 90 टक्क्याच्या पार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 03:36 PM2020-08-19T15:36:48+5:302020-08-19T15:37:13+5:30
मोडक सागर, तुळशी आणि विहार हि धरणे 100 टक्के भरून वाहत आहे. त्यापाठोपाठ तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणातील पाणीसाठ 90 टक्केच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
ठाणे - मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर, मोडक सागर, तुळशी आणि विहार हि धरणे 100 टक्के भरून वाहत आहे. त्यापाठोपाठ तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणातील पाणीसाठ 90 टक्केच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाचा सुरु असलेला लपंडाव, त्यात धरणक्षेत्रात दिलेली ओढ यामुळे धरणांच्या पाणी पातळीत होत असलेली घट यामुळे जिल्हावासीयांना भविष्यात पाणी चिंता भेडसावणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मागील आठ ते दहा दिवसात शहरी, ग्रामीणभागांसह धरणांच्या क्षेत्रात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने हे चित्र पूर्णत: बदलेले. पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ होत असल्याचे चित्र दिसून लागले आहे. त्यात मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार, तुळशी धारणापाठोपाठ मोडकसागर धरण देखील मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुंबईकरनांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.
जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा 77.85 टक्क्यांवर पोहोचला. तर, भातसा धरणातील पाणीसाठा 822.962 दलघमी इतका असून 87.84 टक्के इतका झाला आहे. तर जिल्ह्यात असलेल्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठ देखील 91.71 टक्क्यांवर गेला आहे. तसेच तानसा धरणातील पाणीसाठ्याची देखील 92.18 टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाने या धरणांच्या क्षेत्रात असेच बरसणे सुरु ठेवल्यास येत्या काही दिवसात हि धरणे देखील भरून वाहण्यास सुरुवात होईल.
धरण आजचा पाणीसाठा टक्केवारी
भातसा 822.926 - 87.84
बारवी 263.780 - 77.85
मध्य वैतरणा 177.488 - 91.71
तानसा 145.08 - 92.18