ठाण्यात कोरोनाचे ५०० बेड वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:19+5:302021-03-18T04:40:19+5:30

ठाणे : मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाला रोखा. परंतु, नियमांचे पालन करणे ...

Increased 500 corona beds in Thane | ठाण्यात कोरोनाचे ५०० बेड वाढविले

ठाण्यात कोरोनाचे ५०० बेड वाढविले

Next

ठाणे : मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कोरोनाला रोखा. परंतु, नियमांचे पालन करणे जर शक्य होणार नसेल, तर केवळ निर्बंध घालून उपयोग नाही. त्यासाठी नागपूरप्रमाणेच पूर्णवेळ कडक लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिला. शिवाय, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोनाचे ५०० बेड वाढविले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ठाण्यात ५६३ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च महिन्यात रोजच्या रोज २०० ते ३०० रुग्ण शहरात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि सर्व प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांची बैठक कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयुक्तांनी घेतली होती. यावेळी समन्वय साधून त्यांनी कोरोनाची परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्याच्या सूचना केल्या आहेत.

* अर्ध्या तासात मिळणार रुग्णवाहिका

रुग्णसंख्या वाढत असली तरी ठाण्यात कोविड सेंटर पुरेसे आहेत. रुग्णवाहिकेची सुविधा अर्ध्या तासात उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्या आहेत. पुरेसा औषधसाठा आहे. शहरात विविध रुग्णालयांत पुरेसे बेड उपलब्ध असून आणखी ५०० बेड वाढविल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. व्हेटिंलेटरदेखील पुरेशा प्रमाणात असून घरोघरी जाऊन ताप सर्व्हे पुन्हा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

-९० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले

सध्या रुग्ण वाढत असले तरी त्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जास्तीचे असून आजघडीला ९० टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्तांनादेखील महत्त्वाच्या जबाबदा-या दिल्या असून कोणत्या भागात रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत, त्यामागची कारणे कोणती आहेत, याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

- दक्षता समिती घेणार कोरोनाचा आढावा

कोरोना दक्षता समिती स्थापन करून त्या माध्यमातून कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. कोविड सेंटरसह विलगीकरण केंद्रही सज्ज केले असून त्याठिकाणी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. कोरोनासाठीचा कंट्रोल रूमही सज्ज असून नागरिकांनी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

-टीएमटी बसमध्ये ५० टक्के क्षमतेला परवानगी

ठाणे परिवहनच्या बसमधून ५० टक्के क्षमतेनेच प्रवास करण्याची मुभा दिली असून एक आसन सोडून बसण्याची परवानगी आहे. याचे पालन प्रवाशांनी करावे, असे आवाहन करून शेअर रिक्षांमधूनही जास्तीच्या प्रवाशांना परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नियमांचे पालन करणे नागरिकांची जबाबदारी

ठाणे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, नियम पाळण्याची जबाबदारी ही नागरिकांचीदेखील आहे. त्यामुळे नागरिकांनी या नियमांचे पालन केले तर नक्कीच कोरोनाला रोखण्यात यश येईल, असे मत महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.

Web Title: Increased 500 corona beds in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.