साडेचार कोटींचा वाढीव भार ठामपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:09 AM2018-10-20T00:09:42+5:302018-10-20T00:09:50+5:30
ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपुलांची गरज नसतानाही तीन ते चार वर्षांपासून तीन उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. यातील एक ...
ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपुलांची गरज नसतानाही तीन ते चार वर्षांपासून तीन उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. यातील एक पूल पूर्ण झाला असून तो अनौपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुला केला आहे. परंतु, उर्वरित दोन पुलांची कामे आजही अर्धवट स्थितीत आहेत. त्यात ठेकेदारांकडून पुलांच्या कामांत दिरंगाई होत असताना त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याऐवजी या पुलांच्या वाढीव खर्चाचा चार कोटी ३७ लाखांचा प्रस्ताव पटलावर आहे.
या प्रस्तावानुसार मुंबई प्रदेश विकास महानगर प्राधिकरणामार्फत पूल प्रकल्पाच्या खर्चामध्ये भविष्यात वाढ झाली, तर तो खर्च महापालिकेच्या निधीतून करण्याची अट घातली होती. या अटीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे उड्डाणपुलांच्या वाढीव खर्चाचा भार पालिकेच्या खांद्यावर आला आहे.
शहरात तीन ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. मीनाताई ठाकरे चौक, तीनपेट्रोलपंप आणि नौपाडा या तीन ठिकाणी उड्डाणपुलांसाठी २२३ कोटी ६९ लाख ६१ हजार रु पये इतका निधी खर्च करण्यात येत आहे. एमएमआरडीए तो करत असून या कामाचे तांत्रिक पर्यवेक्षण महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. तीनपेट्रोलपंप भागातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी अनौपचारिकरीत्या खुला केला. तर, मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा येथील पुलांची कामे सुरू आहेत. १८ महिन्यांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, दिलेल्या मुदतीत ती पूर्ण झाली नसल्याने त्याचा फटका ठामपाला बसणार आहे.
सल्लागाराच्या खर्चातही वाढ
दुसरीकडे या पुलांच्या कामांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराच्या खर्चातही वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. महावितरण, पाणीपुरवठा, मलनि:सारण आणि एमटीएनएल या विभागांच्या सेवावाहिन्या स्थलांतरित करणे, मीनाताई ठाकरे चौकातील पुलाच्या खांबांमध्ये केलेले बदल तसेच या पुलाच्या कामांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी, यामुळे पुलांची कामे मुदतीत झालेली नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तसेच मुदतीत कामे झालेली नसल्याने या पुलांच्या कामासाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराची मुदत वाढवावी लागणार असून त्यासाठी एक कोटी १० लाखांचा वाढीव खर्च करावा लागणार आहे.