सोशल मीडियावर वाढली गुंडागर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:47+5:302021-08-26T04:42:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमातील स्टाइलने तलवारीने किंवा गुप्तीने वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियाद्वारे भाईगिरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमातील स्टाइलने तलवारीने किंवा गुप्तीने वाढदिवसाचा केक कापून सोशल मीडियाद्वारे भाईगिरी करण्याचे अनेक प्रकार अलीकडे घडले आहेत. अगदी अलीकडे थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध चिथावणीखोर विधाने करून ती पोस्ट केल्याप्रकरणी मयूर उर्फ मयूरेश कोटकर (३७, रा. ठाणे) यालाही श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियाद्वारे गुंडागर्दी केल्यास कारवाई करण्याचा इशाराच ठाणे पोलिसांनी दिला आहे.
तलवारीने केक कापण्याची फॅशन
तलवारीने केक कापण्याची फॅशनही अलीकडे वाढीस लागली आहे. अशा तऱ्हेने वाढदिवस साजरा केल्यानंतर ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे व्हायरल केली जाते. कधी ती व्हॉट्सॲपच्या स्टेटसवरही ठेवली जाते. कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी २०२० मध्ये अशाच एकाला अटक केली होती, तर २०२१ मध्ये चितळसर पोलिसांनीही अशाच एकावर गुप्तीने वाढदिवसाचा केक कापून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई केली होती.
लाइक करणारेही येणार अडचणीत
* ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून दोन समाजांत शत्रुत्व निर्माण करणाऱ्याविराेधात अब्रूनुकसान केल्याप्रकरणी १२ जून २०२१ रोजी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
* कोपरीतही यू-ट्यूबचा भाई अशी ओळख असलेल्या सिद्धू अभंगे याच्याविरुद्धही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा मजकुराला लाइक करणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाणार असून, त्यांच्यावरही अशा गुन्ह्यांना प्रोत्साहन दिल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
* मार्च २०२१ मध्ये कोळसेवाडीतही वाढदिवसाच्या कार्यक्रमात क्षुल्लक वादातून गोळीबार करून एकाला ठार मारण्याचा प्रयत्न झाला झाला होता.
काेट
तलवार बाळगणे हे बेकायदेशीर आहे. अशाप्रकारे जर कोणी वाढदिवस साजरा करून त्याचे सार्वजनिकरीत्या सोशल मीडियावर प्रदर्शन करणार असेल तर त्यांच्यावर आर्म ॲक्ट तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर