परवानाधारक शस्त्रसंख्येत वाढ, दोन हजार ५९७ शस्त्रे अद्याप जमा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:44 AM2019-04-01T05:44:18+5:302019-04-01T05:44:42+5:30
ठाणे पोलीस आयुक्तालय : परवानाधारकांची घेणार बैठक, दोन हजार ५९७ शस्त्रे अद्याप जमा नाही
सुरेश लोखंडे
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, बंदूक, मशीनगन आदी शस्त्रे बाळगण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी लागू केली आहे. मागील लोकसभेच्या तुलनेत यंदा ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ६२३ परवानाधारक शस्त्रसंख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईसह ग्रामीण भागात शस्त्रसंख्या कमी झाली आहे. जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांतून सहा हजार ९७ शस्त्रास्त्रांपैकी आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार शस्त्रे जमा झाल्याचा दावा ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी केला. उर्वरित दोन हजार ५९७ परवानाधारक शस्त्रांसह बेकायदा शस्त्रांची शोधाशोध सुरू आहे.
लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होताच शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई आदेश जारी झाला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील सहा हजार ९७ परवानाधारक शस्त्रधारकांपैकी गुरुवारपर्यंत तीन हजार ३४४ शस्त्रे जमा करण्यात जिल्हा प्रशासनासह पोलिसांना यश मिळाले. परंतु, नार्वेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत साडेतीन हजारांपेक्षा जास्त परवानाधारक शस्त्रे जमा झाल्याचा दावा केला. याशिवाय ३५ बेकायदा शस्त्रेही पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगितले. उर्वरित दोन हजार ५९७ शस्त्रे अद्यापही जमा झालेली नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात ६२३ परवानाधारक शस्त्रांच्या संख्येत वाढ झाल्याचे यंदा जमा होणाऱ्या वाढीव शस्त्रसंख्येवरून दिसून येत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून तीन हजार ६८७ शस्त्रे जमा केली होती. या निवडणुकीला चार हजार ३१० परवानाप्राप्त शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू आहे. त्यापैकी दोन हजार ९३४ शस्त्रे जमा झाली आहेत. उर्वरित एक हजार ३७६ शस्त्रे जमा झालेली नाहीत. ती जमा करण्यासाठी पोलिसांसह जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणूक कालावधीत ठाणे जिल्ह्यातून सात हजार ३३४ परवानाधारक शस्त्रे जमा झाली होती. यात ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील तीन हजार ६८७ शस्त्रांचा समावेश होता. यावेळी मात्र त्यात सुमारे ६२३ शस्त्रांची वाढ झाली आहे.
आतापर्यंत ठिकठिकाणांहून ३५ बेकायदा शस्त्रे हस्तगत
ग्रामीण शस्त्रसंख्या : ग्रामीण भागातून म्हणजेच पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातून यावेळी ८७१ शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३२१ शस्त्रे जमा झाली असून ५५० शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या लोकसभेच्या तुलनेत या निवडणुकीच्या वेळी ग्रामीण भागातील एक हजार ४१२ परवाना शस्त्रे कमी झाल्याचे आढळून आले. या कमी होणाऱ्या शस्त्रसंख्येला ठाणे जिल्हा विभाजनाचेदेखील मोठे कारण आहे. पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे या तीन लोकसभांसाठी निवडणूक होत आहे.
गेल्यावेळी काहींना वगळले
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील बँका, पेट्रोलपंप, ज्वेलर्स तसेच जीवितास धोका असलेल्यांना ११७ शस्त्रे देण्यात आली होती. पण, त्यांना जमा करण्याच्या कारवाईतून वगळल्याचे तत्कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी सांगितले होते.
नवी मुंबईत शस्त्रसंख्या कमी!
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरातून ९१६ परवाना शस्त्रे जमा करावी लागणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८९ शस्त्रे जमा झाली आहेत. उर्वरित ८२७ शस्त्रे जमा करण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक हजार ३६४ शस्त्रे जमा झाली होती. त्या तुलनेत या निवडणुकीला
४४८ परवानाधारक शस्त्रे
कमी झाली आहेत.