मानसिक ताण वाढला ; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:12+5:302021-05-10T04:40:12+5:30

मुरलीधर भवार लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ...

Increased mental stress; How to live | मानसिक ताण वाढला ; जगायचे कसे?

मानसिक ताण वाढला ; जगायचे कसे?

Next

मुरलीधर भवार

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न उद्भवला. रोजगार बंद झाला. सगळे काही ठप्प झाले. कोट्यवधी लोकांच्या हातचे रोजगार गेले. पहिल्या लाटेतून सावरत असताना पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयंकर दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेडची कमतरता भासली. त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले. पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयंकर दुसरी लाट होती. महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी संचारबंदीसह लॉकडाऊन लागू असला तरी अवघ्या २५ दिवसांत ३५ हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

पहिल्या लाटेच्या वेळी निर्माण झालेल्या मानसिक ताणापेक्षा दुसऱ्या लाटेच्या वेळी मानसिक ताण हा दुप्पट होता. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार रक्ताच्या नात्यातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा सगळ्य़ात जास्त ताण निर्माण होताे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ताण हा नोकरी गेल्यावर निर्माण होतो. या दोन घटनांना ताणाच्या यादीत सर्वोच्च स्थान दिले आहे. कोरोनाने जवळच्या रक्तातील नात्यासह मित्रमंडळींना हिरावून घेतले. त्यांचा मृत्यू झाला तर अनेकांच्या हातचा रोजगार गेला. अनेकांना वेतनकपातीचा सामना करावा लागला. बाहेर जाणे बंद, शिक्षण ठप्प, रोजगार ठप्प, जवळच्यांचे डोळ्य़ांदेखत मृत्यू या सगळ्य़ामुळे मानसिक ताण वाढला आहे. या निराशाजनक वातावरणातून अनेकांच्या मनी भीती आणि ताण सगळ्य़ात जास्त निर्माण झाला आहे.त्यातून बाहेर पडण्यासाठी आशा-अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत. तरच या निराशाजनक वातावरणातून मानसिकरित्या बाहेर पडता येईल, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

--------------

पुरुष सर्वाधिक तणावात

कोरोनामुळे आपले काही बरे-वाईट झाल्यास आपल्या मुलाबाळांचे काय, पत्नी, आईवडिलांना कोण सांभाळणार? भाऊ, बहिणीचे काय होणार हे विविध प्रश्न पुरुषांना अधिक सतावत असतात. तसेच नोकरी गेल्यावर आर्थिक विवंचनेतून ताण येतो. त्यामुळे सर्वाधिक ताणाखाली पुरुष आहेत.

---------------

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत ?

स्त्रियांच्या तुलनेत पुरुष व्यक्त होत नाही ही खरी गोष्ट आहे. पुरुषी वृत्ती त्याला कारणीभूत असू शकते. अथवा त्यांच्यामध्ये अति आत्मविश्वासामुळे त्यांना वाटते की, मला काय होणार आहे. त्यामुळे ते व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाल्यावर अन्य लोकांकडून आपल्यातून न्यूनत्वाची चर्चा केली जाऊ शकते. पुरुष व्यक्त होण्यापेक्षा ताण घेऊन मनातल्या मनात विचार करतात. महिला बोलून मोकळ्य़ा होतात.

---------------

तरुणांचे प्रश्न वेगळेच

कोरोनामुळे तरुणांमध्ये ताण वाढतो. त्यामुळे त्यांना रक्तदाब वाढण्याचे आजार होऊ शकतात. घरातील भाऊ, बहीण, आई-वडील आणि नातेवाईक यांना कोरोना झाला तर ते बरे होतील की नाही, अशी अनिश्चित भावना बळावत आहे. ज्या तरुणांचे वेतन कापले आहे; मात्र त्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. त्यांच्या कामाची वेळ वाढली आहे. जास्त वेळ काम करून घेतले जात आहे. त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यांच्यात चिडचिडपणा वाढत आहे. त्यातून घरात कलह तयार होत आहेत.

----------------

नोकरी गेली आता करू काय ?

जे अविवाहित आहेत. त्यांची नोकरी गेली तर त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. तर जे विवाहित आहेत, त्यांची नोकरी गेली तर त्यांच्या कुटुंबीयांचे कसे काय होणार अशी चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे ताण वाढतो. गेलेली नोकरी रोजगार पुन्हा मिळणार की नाही. या सगळ्य़ातून आर्थिक विवंचना आहे.

----------------

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ताण दुपटीने वाढला आहे. दुसऱ्या लाटेत आधीपेक्षा जास्त मृत्यू झाले. त्यामुळे माझे व माझ्या कुटुंबाचे काय होईल ही चिंता आणि भीती कायम आहे. या निराशाजनक स्थितीत आशा कमी ठेवणे फायदेशीर आहे. त्यानंतर त्या परिस्थितीनुरूप वाढवत नेल्या पाहिजेत.

- डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचार तज्ज्ञ, डोंबिवली.

---------------

येत्या वर्षभरात हेल्पलाइनवर आलेले कॉल - ५११

पुरुष - १७१

महिला - ३४०

--------------

Web Title: Increased mental stress; How to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.