भाडोत्री कार्यकर्त्यांचा वधारला भाव ;२०० ऐवजी आता ५०० रुपयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 02:03 AM2019-10-06T02:03:50+5:302019-10-06T02:03:57+5:30
इंधन दरवाढीमुळे आधीच उमेदवारांचे कंबरडे मोडले असतांना आता प्रचारासाठी लागणा-या भाडोत्री कार्यकर्त्यांचेही पॅकेज तयार आहे.
- अजित मांडके
ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि अर्ज भरण्याची प्रक्रियाही आता संपली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढणार आहे. परंतु, या निवडणुकीत प्रचार करणाºया ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांनाही मंदीचे चटके भासू लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी आपला भाव वाढविला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खाऊनपिऊन २०० रुपये असणारा या कार्यकर्त्यांचा दर आता ५०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे हा कार्यकर्ता या निवडणुकीच्या माध्यमातून आपली मंदी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवाराला मात्र या दरवाढीचा फटका बसला आहे.
लोकसभेनंतर सहा महिन्यांतच विधानसभा निवडणूक लागली आहे. त्यानुसार, जिल्ह्यात विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केले आहेत. अर्ज भरताना अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच मंगळवारपासून खºया अर्थाने प्रचार रॅली, रोड शो, सभा आदींसह इतर प्रत्येक ठिकाणी उमेदवाराला ‘त्या’ कार्यकर्त्याची गरज लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आधीपासूनच या कार्यकर्त्यांचे बुकिंग केले असून त्यांचे दर जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हातात झेंडा घेऊन ‘आवाज कुणाचा’, ‘निवडून निवडून येणार कोण’, ‘बघतोस काय रागाने’ अशा घोषणा देणाºया त्या कार्यकर्त्यांना दिवसाचे २०० रुपये मिळत होते. यामध्ये काही ठिकाणी चहा, नाश्ता, जेवणही मिळत होते. परंतु, आता देशभर मंदीचे सावट आल्याने या मंदीतून सावरण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनीही आपला भाव वाढवला आहे. आता खाऊनपिऊन ५०० रुपयांचा भाव सुरू असल्याची माहिती आहे. मतदारसंघातील तगड्या उमेदवाराकडे भाडोत्री कार्यकर्त्यांची रीघ लागलेली दिसून येत आहे. पुन्हा निवडणूक लागलीच नसल्याने हीच संधी आहे.
ठेकेदारांचे रेटकार्ड
इंधन दरवाढीमुळे आधीच उमेदवारांचे कंबरडे मोडले असतांना आता प्रचारासाठी लागणा-या भाडोत्री कार्यकर्त्यांचेही पॅकेज तयार आहे. पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे पॅकज तयार आहे. थेट पॅकेजमध्ये काही प्रमाणात दर कमी केला जात आहे. तसेच किती कार्यकर्ते हवेत, कोणते हवेत, महिला, तरुण, जेष्ठ आदींचीही यादी तयार आहे. त्यानुसार उमेदवाराला जे परवडेल ते मिळत आहे.