लसीकरणासाठी ‘शास्त्रीनगर’वर वाढणार ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:13 AM2021-03-13T05:13:12+5:302021-03-13T05:13:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिववली महापालिकेच्या रुग्णालयांव्यतिरिक्त डोंबिवलीत दोन खासगी रुग्णालयांत कोरोनाची लसीकरण मोहीम सुरू आहे; मात्र लसीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिववली महापालिकेच्या रुग्णालयांव्यतिरिक्त डोंबिवलीत दोन खासगी रुग्णालयांत कोरोनाची लसीकरण मोहीम सुरू आहे; मात्र लसीचा साठा संपल्याने गुरुवारी तेथे लसीकरण होऊ शकले नाही. तसेच शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस लसीकरणाची मोहीम थांबणार आहे. रविवारी किंवा सोमवारी चौकशी करून लसीकरणासाठी येण्याची विनंती रुग्णालय व्यवस्थापनांकडून नागरिकांना केली जात आहे. दरम्यान, खाजगी रुग्णालयांत लस मिळत नसल्याने लसीकरणासाठी पश्चिमेतील मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयावर ताण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पूर्वेतील एमआयडीसीतील आर. आर. बाज, एम्स या दोन खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे. तेथे नागरिक शुल्क भरून लस घेत असून, तेथे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, बुधवारी दुपारनंतर एम्स रुग्णालयातील लसीचा साठा संपला. त्यामुळे अपॉईंटमेंट असतानाही पुन्हा माघारी फिरावे लागल्याने लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जर महापालिका पुरेसा लसीचा साठा वितरित करू शकणार नसेल, तर मात्र शहरातील आणखी १७ खासगी रुग्णालयांत लसीकरणाची सुविधा सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासन राज्य शासनाकडे पाठपुरावा का करत आहे? असा सवाल नागरिक करीत आहेत. त्यामुळे आधी मुबलक प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून लसीकरणात खंड पडणार नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
क्रीडासंकुल, जिमखान्यात सुविधा सुरू करा
- पाथर्लीतील महापालिकेच्या भिसे शाळेतील लसीकरण केंद्र बंद होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार गुरुवारी महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असल्याने ते बंद होते, तर शुक्रवारपासून त्या केंद्रावर लसीकरणाची सुविधा नसेल, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी स्पष्ट केले.
- त्यामुळे आता पुढील तीन दिवस केवळ शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती टाळण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाला नियोजन करावे लागणार आहे.
- कोपर उड्डाणपूल बंद असल्याने पश्चिमेस शास्त्रीनगर रुग्णालयात ये-जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडा संकुल, जिमखाना येथे प्रस्तावित सुविधा केंद्रासंदर्भात तातडीने हालचाली करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
-------------