अंबरनाथ-बदलापूरसाठी वाढीव पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:17 AM2018-10-23T03:17:29+5:302018-10-23T03:17:33+5:30

कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी शासनाने या शहरांसाठी वाढीव पाणी मंजूर केले आहे.

Increased water for Ambernath-Badlapur | अंबरनाथ-बदलापूरसाठी वाढीव पाणी

अंबरनाथ-बदलापूरसाठी वाढीव पाणी

Next

पंकज पाटील।
बदलापूर/अंबरनाथ : कुळगाव - बदलापूर नगरपरिषदेच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी शासनाने या शहरांसाठी वाढीव पाणी मंजूर केले आहे. सोबत अंबरनाथ शहरासाठी देखील वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. बदलापूरसाठी २६ तर अंबरनाथसाठी २४ दशलक्ष लीटर्स पाणी देण्यात येणार आहे. दोन्ही शहरांची एकत्रित पाणी पुरवठा योजना असल्याने दोन्ही शहरांना मिळून ५० दशलक्ष लीटर्स जास्त पाणी मिळणार आहे. हे पाणी बारवी धरणातून उपलब्ध होणार आहे.
बारवी धरणाची उंची वाढल्यावर या धरणात निर्माण झालेला अतिरीक्त पाणी साठा आपल्याला उपलब्ध व्हावा, यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिका आणि नगरपालिकांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवले होते. या पाण्याचे नियोजन कशा प्रकारे करावे याबाबत तीन वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू होती. तसेच बारवी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्नही निकाली निघत नसल्याने पाण्याचे वाटप थांबवण्यात आले होते.
आजच्या घडीला बदलापूरसाठी जीवन प्राधिकरणामार्फत ४० दशलक्ष लीटर्स पाणी पुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या पाहता हा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे बदलापूरला अतिरिक्त पाण्याची गरज गरज भासत होती. बारवी धरणाच्या उंची वाढविण्याच्या कामानिमित्ताने बदलापूरला अतिरीक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र या धरणातून नेमके किती पाणी मिळणार याबाबत कोणालाच कल्पना नव्हती.
दुसरीकडे अंबरनाथ शहरासाठी २४ दशलक्ष लीटर्स पाणी मंजूर केले आहे. अंबरनाथची पाणी पुरवठा योजना ही जीवन प्राधिकरण चालवत असल्याने हे अतिरिक्त पाणी देखील प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे.
अंबरनाथ शहराला नियमितरित्या ५५ दशलक्ष लीटर्स पाणी पुरवठा नियमित करण्यात येत आहेत. मात्र वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आणि पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे हा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे वाढलेल्या पाणी साठ्यामुळे भविष्यातील अंबरनाथच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरचे एकूण ५० दशलक्ष लीटर्स पाणी हे जीवन प्राधिकरणाकडे येत असल्याने आता या पाण्याचे नियोजन करून जीवन प्राधिकरण बदलापूरसाठी उल्हास नदीतून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अंबरनाथला पाणी पुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडून येणाऱ्या पाण्याचा वापर करणार आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटी कमी होण्यास मदत होणार आहे.
बारवी धरणातून पाणी उचलण्यासाठी दोन्ही पालिकांना पाण्याचे आरक्षण मंजूर केलेले असले तरी त्या पाण्याची उचल कधी करण्यात येईल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पाण्याचे आरक्षण वाढवून मिळालेले असले तरी अजूनही वाढीव पाण्याची लागलीच गरज भासणार नाही.
टप्प्याटप्प्याने या पाण्याचा वापर होणार असल्याने लागलीच वाढीव पाण्याचे करणार काय हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी एकूण ५० दशलक्ष लीटर्स पाणी मंजूर झालेले असले तरी सद्यस्थितीत किती वाढीव पाणी लागणार आहे हे प्राधिकरणाने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
>अंबरनाथ आणि बदलापूरसाठी एकूण २५ दशलक्ष लीटर्स पाण्याची मागणी केली होती. मात्र, बदलापूर शहर झपाट्याने वाढत असल्याने दोन्ही शहरांसाठी एकत्रित २५ दशलक्ष लीटर्स पाणी न मागता, बदलापूरसाठी स्वतंत्र २६ दशलक्ष लीटर्स पाण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आज बदलापूरला स्वतंत्र २६ आणि अंबरनाथला स्वतंत्र २४ दशलक्ष लीटर्स पाणी मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांना अपेक्षेपेक्षा जास्त पाणी मिळनार आहे. - किसन कथोरे, आमदार, मुरबाड मतदार संघ
>वितरण व्यवस्था योग्य हवी
बारवी धरणात उंची वाढल्याने धरणात निर्माण झालेला ४८८ दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाण्यातून काही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.
त्यात अंबरनाथ शहरासाठी २४ दशलक्ष लीटर्स अतिरिक्त पाणी मंजूर करण्यात आले आहे. तर बदलापूर शहरासाठी २६ दशलक्ष लीटर्स पाणी मंजूर करण्यात आले आहे.
यामुळे पुढील २० वर्षांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत सुधारणा न झाल्यास पाण्याचा प्रश्न हा बदलापूरला त्रासदायक ठरणार आहे.

Web Title: Increased water for Ambernath-Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.