पाणी वाढले, बिल वाढले; नागरिकांमध्ये मात्र संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 08:17 PM2018-02-08T20:17:31+5:302018-02-08T22:21:21+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे.
- राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे. पाणी दरवाढीला १५ डिसेंबर २०१७ रोजीच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली असुन त्याची अंमलबजावणी यंदाच्या एप्रिलपासून होणार आहे. त्यापुर्वीच बिलाची रक्कम अचानक वाढल्याने नागरीक संभ्रमात पडले आहेत.
पालिकेकडुन २०१४ पर्यंत पाणीपुरवठ्याच्या निवासी व व्यावसायिक वापरासाठी प्रती १ हजार लीटरसाठी अनुक्रमे ७ रुपये व २८ रुपये दर वसुल केला जात होता. गेल्या १० वर्षांत पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याचे कारण पुढे करीत प्रशासनाने त्याच्या दरवाढीचा प्रस्ताव २०१५ मधील स्थायीत सादर केला होता. स्थायीने त्याला मान्यता दिल्यानंतर ३० एप्रिल २०१५ रोजीच्या महासभेने निवासी दरात ३ रुपये व वाणिज्य दरात १२ रुपये दरवाढीला मान्यता दिली. त्यामुळे सध्या प्रती १ हजार लीटर पाणीपुरवठ्यामागे निवासी वापरासाठी १० रुपये तर व्यावसायिक वापरासाठी ४० रुपये दर पालिकेकडुन वसुल केला जात आहे. या दरवाढीला किमान ३ वर्षे पुर्ण होत नाही तोवर पुन्हा १५ डिसेंबर २०१७ रोजीच्या स्थायी समितीने निवासी दरात २ रुपये व व्यावसायिक दरात १० रुपयांच्या दरवाढीस मान्यता दिली. गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीत केलेली हि दरवाढ जवळपास दुप्पट ठरणार असतानाच पालिकेला दोन वर्षांपुर्वीच्या १२६ एलएलडी पाणीपुरवठ्यात ५० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा उपलब्ध होऊ लागला आहे. पालिकेला एमआयडीसी कोट्यातून मंजुर झालेल्या ७५ एमएलडीपैकी २०१५ मध्ये २० तर ३० एप्रिल २०१७ पासून ३० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नागरीकांच्या पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी उर्वरीत २५ एमएलडी पाणीपुरवठा येत्या एप्रिलमध्ये सुरु होण्याची शक्यता प्रशासनाकडुन वर्तविली जात आहे. शहरात निवासी नळजोडण्यांची संख्या ३४ हजार १९४ व व्यावसायिक नळजोडण्यांची संख्या २ हजार ७७० इतकी आहे. तर काही ठिकाणी बेकायदेशीर नळजोडण्या दिल्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये उजेडात आल्याने त्याविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परिणामी वाढलेल्या अतिरीक्त पाण्यामुळे पाण्याची बिले अचानकपणे भरमसाठ वाढल्याने नागरीक संभ्रमात पडले आहेत. वास्तविक पाणी २०१५ पासून वाढले असले तरी बिलात त्यावेळी झालेल्या दरवाढीखेरीज गतवर्षीच्या सप्टेंबर २०१७ पर्यंत पाण्याची बिले १० रुपये दरानेच वसुल करण्यात येत होती. सप्टेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या चार महिन्यांच्या बिलांचे नुकतेच वाटप करण्यात आले असता त्यात अचानक ४० ते ५० टक्के वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरीक चक्रावून गेले आहेत. स्थायीने यंदा पाणीपट्टीत प्रती १ हजार लीटरमागे केलेली २ रुपयांची दरवाढ एप्रिल २०१८ पासून लागू केली जाणार असतानाही पाण्याच्या बिलांतील रक्कम कशी काय वाढली, असा प्रश्न नागरीकांसमोर उपस्थित झाला आहे. या वाढीव बिलांचे गौडबंगाल बेकायदेशीर नळजोडण्यांमध्ये असुन बेकायदेशीरपणे होणाय््राा पाणीपुरवठ्याचे शुल्क अधिकृत नळजोडण्यांद्वारे होणाय््राा पाणीपुरवठ्यात समायोजित केले जाते कि काय, असा संशय देखील व्यक्त होऊ लागला आहे.
अतिरीक्त पाणीपुरवठा वाढल्याने नागरीकांना करण्यात येणाय््राा पाणीपुरवठ्याच्या कालावधीत वाढ झाली आहे. परिणामी नागरीकांकडुन पाण्याचा वापर जास्त होऊ लागल्यानेच बिलांतील शुल्क वाढले आहे.
- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे
वाढलेला अतिरीक्त पाणीपुरवठा पालिकेला २०१५ व एप्रिल २०१७ पासून मिळत असताना पालिकेने त्यावेळपासुन नागरीकांना कमी पाणी दिले होते का? त्यावेळी व आत्ता आम्हाला पाणी तेवढेच मिळत असताना अचानक सप्टेंबरमध्येच पाणी कसे काय वाढले? नागरीकांना देण्यात आलेल्या वाढीव बिलांतील रक्कम बेकायदेशीर पाणीपुरवठ्यातील तफावतीला दूर करण्यासाठीच केला जात असुन त्याची चौकशी व्हावी.
- माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया