श्रेयवादाच्या लढाईत अडकले वाढीव पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:39 AM2021-01-04T00:39:06+5:302021-01-04T00:39:08+5:30

महापौरांनी आदेश देऊनही प्रशासन ढिम्म : भाजप नगरसेवकाची टीका

Increased water stuck in the battle of credulity! | श्रेयवादाच्या लढाईत अडकले वाढीव पाणी!

श्रेयवादाच्या लढाईत अडकले वाढीव पाणी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : घोडबंदर रोडसह ब्रह्मांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही घोडबंदर रोड परिसराला अद्याप वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. या भागाला गेली दोन वर्षे पाणीटंचाईचे चटके बसत असून, शिवसेना व भाजपच्या श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडवरील रहिवाशांचे पाणी अडकल्याची चर्चा आहे. मात्र याबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईविरोधात भाजपचे स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. त्यानंतर भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबरला आयुक्तांच्या दालनात बैठकही झाली. त्यात घोडबंदरवासीयांसाठी वाढीव १० दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याचे निर्देश आयुक्तांना दिले. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठक घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याचे निर्देश दिले. दुसऱ्या दिवशी शिवसेनेमुळेच एका बैठकीत पाणीप्रश्न सुटल्याचा दावा त्यांनी केला होता. महापौरांच्या या श्रेय घेण्याच्या प्रयत्नांस डुंबरे यांनी आक्षेप घेतला. गेली दोन वर्षे पाण्यासाठी संघर्ष सुरू असताना शिवसेना झोपली होती का, असा सवाल त्यांनी केला.


महापौरांच्या स्पष्ट निर्देशाला तीन आठवडे उलटल्यानंतरही, घोडबंदर रोडवरील पाणीटंचाई कायम आहे. सेना विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अलीकडेच महापौरांची भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यानंतर सोशल मीडियावर पाणीटंचाई लवकरच दूर होणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी सेनेचे स्थानिक पदाधिकारी श्रेय घेण्याकरिता सरसावले आहेत.

संतापाची भावना 
दोन वर्षांपासून घोडबंदर परिसरासह ब्रह्मांड भागाला पाणीटंचाईचा फटका बसत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भाजप-शिवसेनेकडून वाढीव पाण्याचे दावे केले जात आहेत. श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडचे पाणी अडकले त्याबाबत संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Increased water stuck in the battle of credulity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.