डिंक, मेथीच्या लाडूला वाढती मागणी
By admin | Published: November 24, 2015 01:34 AM2015-11-24T01:34:16+5:302015-11-24T01:34:16+5:30
थंडीचे आगमन होत असताना घराघरांत थंडीपासून संरक्षण करणारे पदार्थ तयार होताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने डिंक लाडू, आळीव लाडू, मेथी लाडू यांचा समावेश आहे
ठाणे : थंडीचे आगमन होत असताना घराघरांत थंडीपासून संरक्षण करणारे पदार्थ तयार होताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने डिंक लाडू, आळीव लाडू, मेथी लाडू यांचा समावेश आहे. बाजारात तयार डिंकाचे लाडू ४८० रुपये किलोने मिळत असून मेथीचे लाडू ३८० रुपये किलोने मिळत आहेत. मात्र, हे लाडू बनविण्यासाठी लागणाऱ्या सामग्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर, गूळ व खोबरे यांच्या किमतीमध्ये घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
डिंक, मेथी हे पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात. तसेच सुकामेवा, खोबरे यांचा वापरही पदार्थ तयार करताना केला जातो. त्यामुळे हे पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. हे लाडू बनविण्यासाठी लागणारा डिंक २०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध असून यामध्ये नैसर्गिक आणि पॉलिस्टर डिंक उपलब्ध आहे. तर, १०० रुपये किलो याप्रमाणे मेथीचे दाणे उपलब्ध आहेत.
या वेळी सुकामेवा मात्र महागल्याने सुकामेव्याचा वापर कमी करणार असल्याचे गृहिणींनी सांगितले. साजूक तुपात डिंक व्यवस्थित फुलतो, त्यामुळे साजूक तूप वापरण्याला पर्र्याय नसल्याचेही गृहिणीने सांगितले. मात्र, साजूक तूप महाग झाल्याने त्याला पर्याय म्हणून डालड्याचा वापर करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.