CoronaVirus News: रुग्णसंख्या वाढती : संपूर्ण ठाणे शहर ३१ मेपर्यंत लॉक डाउन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:52 AM2020-05-28T00:52:05+5:302020-05-28T00:52:24+5:30
शहरात गेल्या २६ दिवसांत कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
ठाणे : ठाणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ४१ टक्क्यांच्या आसपास आले असले, तरी बाधितांची संख्या वाढत असल्याने महापलिका प्रशासन शहरातील अनेक भाग टप्प्याटप्प्याने बंद करीत होते. परंतु, तरीही रुग्णसंख्या वाढत असल्याने ३१ मेपर्यंत सर्वच प्रभाग समित्यांचे क्षेत्र पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. तशा आशयाचे परिपत्रक प्रत्येक प्रभाग समितीने काढले आहे. विशेष म्हणजे काही प्रभाग समित्यांमध्ये अत्यावश्यक सामानांसाठी होम डिलिव्हरीवर भर दिला आहे, तर काही ठिकाणी दूध डेअरी आणि मेडिकल सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.
शहरात गेल्या २६ दिवसांत कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. २१ मार्च ते एप्रिलअखेर कोरोनाचे ३०० रुग्ण होते. मात्र, १ मे ते २६ मे या कालावधीत त्यांची संख्या १९९४ ने वाढली आहे. त्यामुळे १० प्रभाग समित्यांचे क्षेत्र हायरिस्कमध्ये आहे. प्रत्येक प्रभाग समितीत झोपडपट्टीचा भाग अधिक असून दाटीवाटीने घरे आहेत. त्यामुळे सुरुवातीला मुंब्य्रात लॉकडाउन घेतले होते. त्यानंतर, ईदमुळे ते शिथिल केले होते. आता पुन्हा ते घेतले आहे. त्यानंतर, लोकमान्य आणि वागळेमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता काही दिवसांपासून पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. कळव्यातही टाळेबंदी केली आहे. दिव्यातही तसाच प्रकार असल्याने येथेही लॉकडाउन आहे. कोपरी परिसरही रेड झोनमध्ये समाविष्ट झाल्यापासून, येथील सेवा निर्धारित वेळेत सुरू आहेत. मात्र, आता तेथेही ३१ मेपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन केले आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत कोरोनाचे १२४ रुग्ण आढळले असून येथेही तिसऱ्यांदा लॉकडाउन घेतले आहे.
जवळजवळ प्रत्येक प्रभाग समितीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने येत्या ३१ मेपर्यंत सर्वच १० प्रभाग समित्या पूर्णपणे बंद केल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहणार असून नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, काही ठिकाणी होम डिलिव्हरी ठेवली आहे, तर काही ठिकाणी केवळ दूध आणि मेडिकलची दुकाने सुरू राहणार आहेत.