नूतन विद्यालयात उपक्रमांमुळे वाढली पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:59 PM2018-07-26T23:59:01+5:302018-07-26T23:59:52+5:30

साजरा होतो ‘विद्यार्थी दिन’; विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची मिळते संधी

Incremental number of initiatives in the new school | नूतन विद्यालयात उपक्रमांमुळे वाढली पटसंख्या

नूतन विद्यालयात उपक्रमांमुळे वाढली पटसंख्या

googlenewsNext

- जान्हवी मोर्ये

कल्याण : शाळेत विविध प्रकारचे साजरे होणारे दिन, वेगवेगळ्या स्पर्धांचे केले जाणारे आयोजन तसेच विविध उपक्रम यामुळे कल्याणच्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय या मराठी शाळेची पटसंख्या वाढली आहे.
शिक्षक, मातृ आणि पितृ दिनाबरोबरच शाळेत विद्यार्थी दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी अभ्यासएवजी काव्यवाचन, वक्तृत्व आणि निबंध अशा स्पर्धांमध्ये भाग घेतात. विद्यार्थ्यांचे कोडकौतुक केले जाते. अनेक शालेय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढीस लागल्यामुळे शाळेची पटसंख्या ४५ ने वाढली आहे.
१९६० मध्ये स्थापन झालेल्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यालय या शाळेला ५७ वर्षे पूर्ण झाली आहेत. गोडबोले यांच्या छोट्याशा जागेत शाळा सुरू झाली. सुरुवातीला पाचवी आणि आठवी या दोन वर्गांनी प्रारंभ झाला. आज शाळेत पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभाग आहेत. कल्याणचे दानशूर व्यक्ती दिवंगत प्रभाकरपंत कर्णिक यांनी शाळेला जागा दिली. याच जागेत शाळेची इमारत उभी आहे. संस्थेत ‘मागेल त्याला शिक्षण’ या तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांतून बहुसंख्य पालक त्यांच्या मुलांच्या शालेय प्रवेशासाठी या शाळेस प्राधान्य देतात.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वेणुनाथ कडू म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ७ नोव्हेंबर रोजी प्रथम शाळेत गेलो होतो. त्यामुळे हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो. दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका, दत्तक पालक योजना राबवण्यात येते. आंतरराष्ट्रीय योग दिन, आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथदिंडी, लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून घोषवाक्य स्पर्धा व टिळक पुण्यतिथीनिमित्त कथाकथन स्पर्धा घेतली जाते. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा होतो. वर्ग सजावट स्पर्धा घेतली जाते. संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले जाते. तसेच परिसरात ‘संविधानयात्रा’ काढली जाते. केंद्रीय संचार राज्यमंत्री मनोज सिंह आयोजित ‘प्रिय बापू तुम्ही मला प्रेरित करता’ या विषयावर गांधीजींना पत्रलेखन स्पर्धा घेतली जाते. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेत आठवीतील मयूर नागरे, इयत्ता नववीतील नेहा पाडवी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
वनविभाग परिसर संशोधन केंद्र, शहापूर येथे भेट दिली आहे. विद्यार्थ्यांना राजेश अडांगळे व मंगल टकले या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तंबू बांधणे, शिबिर विद्या या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. २०१७-१८ मध्ये आठ स्काउटच्या मुलींची राज्य पुरस्कारांसाठी निवड झाली. यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Web Title: Incremental number of initiatives in the new school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.