खाऊ वाटपावेळी नऊ मुला-मुलींशी अश्लील वर्तन; बसच्या समन्वयकास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: February 21, 2024 09:01 PM2024-02-21T21:01:31+5:302024-02-21T21:02:46+5:30
...त्याला २४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे : ठाण्यातून घाटकाेपरला सहलीसाठी गेलेल्या सीपी गोएंका या इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेतील नऊ मुलामुलींचा विनयभंग करणाऱ्या जावेद खान (२८) या टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्सच्या समन्वयकास अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी बुधवारी दिली. त्याला २४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
माजीवडा, कापूरबावडी नाका याठिकाणी असलेल्या या शाळेच्या पहिली आणि दुसरीच्या वर्गाची शैक्षणिक सहल २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी आठ वाजता घाटकोपर भागातील किंडजेनिया उद्यानात गेली होती. सायंकाळी चारच्या दरम्यान सहलीची मुले पुन्हा शाळेत परतली. त्यावेळी ट्रॅव्हल्सचा समन्वयक जावेद या कर्मचाऱ्याने मुलांना खाऊ वाटपाच्या निमित्ताने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. काही मुलामुलींच्या गुप्तांगालाही हात लावत त्याने चाळे केल्याचे सहलीवरून परतल्यानंतर मुलांनी त्यांच्या पालकांना सांगितले. अशा आठ मुली आणि एका मुलासह नऊ मुलांच्या पालकांनी अशाच तक्रारी केल्या.
याबाबत संतप्त पालकांनी तक्रार केल्यानंतर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असल्याचेही ते म्हणाले.
मनसेचा शाळेवर हल्लाबोल
शाळेच्या सहलीदरम्यान झालेल्या या प्रकाराची मनसेनेही गंभीर दखल घेतली. मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मनसैनिकांनी शाळेवर कारवाईची मागणी केली. यावेळी पालकांनीही बुधवारी सकाळी शाळेत गोंधळ घालून आपला संताप व्यक्त केला.