नोंदणी-मुद्रांकच्या अराजपत्रित अधिकाऱ्यांचा बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:56+5:302021-09-23T04:46:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला. जिल्ह्यासह राज्यभर नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपत्रित अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष डेबडे यांच्यासह राज्य कर्मचाऱ्यांचे नेते भास्कर गव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली.
नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांच्या शासनाकडे मागील चार वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी या राज्यस्तरीय बेमुदत संपाचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या त्वरित करण्यात याव्या, पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे, रिक्त पदे तत्काळ भरणे, कोरोनामुळे मृत झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाखांची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेणे, आदी मागण्या या कर्मचाऱ्यांनी लावून धरल्या आहेत.
------------------