भिवंडीत BNN महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत संप आंदोलन
By नितीन पंडित | Published: February 20, 2023 05:40 PM2023-02-20T17:40:49+5:302023-02-20T17:41:14+5:30
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारला बेमुदत संप
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: बारावी परीक्षा सुरू होत असताना महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती तर्फे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू केले असून सोमवारी भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयातील ६० कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केले आहे.
सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवीत करुन पुर्ववत करणे,सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०,२०,३० वर्षानंतरच्या लाभाची योजना लागु करावी,सातव्या वेतन आयोगा नुसार वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकबाकीसह सातवा वेतन आयोग लागु करावा,विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी,२००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी,विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहित धरुन त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागण्या असून हे बेमुदत आंदोलन सुरू करण्या आधी वेगवेगळ्या टप्प्यातील आंदोलन २ फेब्रुवारी पासून सुरू केले मात्र शासनकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे बेमुदत संपाच्या आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले अशी प्रतिक्रिया बीएनएन महाविद्यालय युनिट प्रमुख भालचंद्र काठे यांनी दिली आहे.