राज्यात १ ऑगस्टपासून 2.5 लाख रिक्षा चालकांचा बेमुदत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:27 PM2022-07-27T13:27:59+5:302022-07-27T13:28:59+5:30
अडीच लाख चालक होणार सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाढत्या सीएनजी दरामुळे रिक्षा भाडेवाढ लागू करावी तसेच रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या इतर प्रलंबित मागण्या सोडविण्याकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्टपासून कोकण विभागातील सर्व रिक्षा-टॅक्सीचालकांनी बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी मंगळवारी दिली. अडीच लाख रिक्षाचालक या बंदमध्ये सहभागी होतील, असा दावा त्यांनी केला.
सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिवहन प्रशासन इंधन दरवाढ नियंत्रण किंवा महागाई निर्देशांकानुसार रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. गेल्या दोन वर्षांत सीएनजी दरामध्ये किलोमागे सरासरी २८ रुपये इतकी वाढ झालेली आहे. परिवहन विभागाने रिक्षा-टॅक्सी परवाने वाटप तत्काळ बंद करावे. नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलनाद्वारे दंड आकारणी करावी. वाहतूक पोलीस विभागामार्फत मोबाइल फोटोद्वारे करण्यात येणारी वसुली बंद करावी. रिक्षा -टॅक्सी व्यावसायिकांकरिता महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयीसुविधा पुरवाव्यात आदी मागण्या केल्या आहेत. कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी जितेंद्र इंदिसे, दयानंद गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
मनमानी असेल तर तक्रार करा
काेणी रिक्षाचालक जर मनमानी पद्धतीने जादा प्रवासी नेत असेल किंवा शेअर रिक्षाच्या प्रवाशांकडून जादा भाडे वसूल करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध आरटीओकडे तक्रार करावी. संघटना अशा रिक्षाचालकांचे समर्थन करणार नाही; परंतु भाडे नाकारण्याला काही याेग्य कारणे असतात, हेही प्रवाशांनी लक्षात घ्यावे, असे पेणकर व इंदिसे म्हणाले.